

जळगांव : दि.(धर्मेंद्र राजपूत) जळगाव जिल्ह्यातील सुरवाडा येथील रहिवासी आणि दादाश्री विश्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना मुंबईत अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्याज फाउंडेशन’ आणि ‘भारतीय जैन संघटना’ यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.’वर्षा’ निवासस्थानी दिमाखदार सोहळा२१ जून रोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगला येथे हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस आणि भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा प्रामुख्याने उपस्थित होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. २०२६ च्या पुरस्कारासाठी डॉ. प्रीतीश चौधरी यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.
सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल
डॉ. प्रीतीश चौधरी यांनी दादाश्री विश्व ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य शिबिरे आणि मुख्य म्हणजे बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच निस्वार्थी आणि उल्लेखनीय कार्याचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉ. प्रीतीश चौधरी म्हणाले, “या पुरस्कारामुळे मला भविष्यात आणखी मोठे सामाजिक कार्य करण्याचे बळ मिळाले आहे. समाजातील शोषित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.” डॉ. चौधरी यांच्या या यशामुळे जळगाव जिल्हा आणि सुरवाडा परिसराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचावले असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




