उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्या सूचनेनुसार जळगाव शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर


जळगांव दि.22 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणामध्ये सध्या सुमारे 62 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा साठा अंदाजे 7 महिने पुरेल एवढाच आहे. शहरात पूरक जलस्रोत म्हणून 43 विहिरी व 60 बोअरवेल कार्यरत आहेत. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रभावी नियोजन करण्यासाठी जळगाव शहराचे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिका प्रशासनास व्यापक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी विशेषतः रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी संधारण) धोरणाची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला असून, शहरातील प्रत्येक मोठ्या बांधकाम प्रकल्पात, व्यापारी संकुलात, गृहसंकुलात, शासकीय कार्यालयात, शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी संधारण व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
रेन वॉटर हार्वेस्टिंग हा दीर्घकालीन उपाय
दरवर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नाल्यांद्वारे वाहून जाते. हे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिका क्षेत्रात रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशी भूमिका उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी मांडली आहे.
पाणी बचतीसाठी 20 टक्के लक्ष्य शहरातील एकूण पाणी वापरामध्ये किमान 20 टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी गळती नियंत्रण, अनधिकृत वापरावर कारवाई, पुनर्वापर आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे.
कार/व्हायकल वॉश व्यवसायांवर नियंत्रणाची सूचना
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी प्रशासनास स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या नवीन कार वॉश व्यवसायांना किंवा तत्सम व्यावसायिक वापरासाठी पिण्याच्या पाण्याचा अनिर्बंध वापर होईल अशा प्रकल्पांना परवानगी देताना विशेष दक्षता घ्यावी. अशा व्यवसायांनी पुनर्वापरित पाणी किंवा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे.पाणी चोरी आणि गळतीवर कठोर कारवाई
शहरातील सर्व जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून गळतीग्रस्त भागांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. अनधिकृत कनेक्शन, बायपास लाईन, मीटरमध्ये छेडछाड तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
RO वेस्ट वॉटरचा पुनर्वापर
घरगुती व व्यावसायिक स्तरावर RO वेस्ट वॉटरचा वापर साफसफाई, फ्लशिंग, बागकाम व इतर दुय्यम कामांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जनजागृती मोहिमेला चालना
“माझे पाणी – माझा अभिमान” या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना व नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांचे आवाहन
“वाघूर धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आजपासूनच प्रत्येक जळगावकराने पाणी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर आणि अपव्यय रोखणे ही काळाची गरज आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून जळगाव शहर जलसुरक्षित बनवूया,” असे आवाहन उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी केले




