महायुतीचे नंदकिशोर महाजन यांच्या प्रचारासाठी भाजप नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक; मतदानाची रणनीती निश्चित


जळगाव :दि.15 जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी रणनीती, मतदान प्रक्रिया तसेच निवडणुकीसंदर्भातील विविध बाबींवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पुर्वचे जिल्हाअध्यक्ष चद्रकात बाविस्कर , पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, गटनेते प्रकाश बालाणी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, विशाल त्रिपाठी यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची ताकद, राज्यातील विकासकामे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या नियमांची माहिती देण्यात आली. मतदान करताना घ्यावयाची काळजी, मत वैध राहण्यासाठी आवश्यक बाबी तसेच निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नगरसेवकांनी विविध प्रश्न उपस्थित करून त्याबाबत माहिती जाणून घेतली.
महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला मिळत असलेला वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता ही निवडणूक एकतर्फी होईल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. एकजूट, पक्षशिस्त आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविली जात असून नंदकिशोर महाजन यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मान्यवरांनी केले.
बैठकीमुळे भाजप नगरसेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून महायुतीच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.




