जळगावात मनपाचा ‘अतिक्रमण हटाव’चा फार्स; कारवाई फक्त गरिबांवरच? धनाढ्यांच्या महाकाय अतिक्रमणांना अभय का?


जळगांव दि.26 धर्मेंद्र राजपूत, शहरातील प्रमुख रस्ते आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जळगावच्या नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमण धारकांवर कडक कारवाई करत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक महत्त्वाचे चौक आणि रस्त्यांवर अनधिकृतपणे टाकलेल्या टपऱ्या व हातगाड्यांवर मनपाचे पथक थेट जप्तीची कारवाई करत आहे. मात्र, मनपाची ही मोहीम आता तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, “प्रशासन फक्त गरिबांचेच संसार रस्त्यावर आणत आहे का?” असा गंभीर आरोप जळगावकरांकडून केला जात आहे. एकीकडे हातावर पोट असणाऱ्यांवर बडगा उगारला जात असताना, शहरातील बड्या धेंडांच्या आणि धनाढ्यांच्या आलिशान अतिक्रमणांना मात्र प्रशासनाकडून हेतुपरस्पर अभय दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महापौर रस्त्यावर, पण कारवाईत दुजाभाव का?
महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा चंग बांधला असून, त्यांनी मोहिमेत ढिलाई दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जागेवरच धारेवर धरले. परंतु, ही धडक मोहीम केवळ गरीब आणि सर्वसामान्य व्यापाऱ्यांपुरतीच मर्यादित का? असा संतप्त सूर उमटत आहे. शहरातील अनेक मुख्य चौक आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मोठ्या राजकारण्यांच्या, उद्योजकांच्या आणि धनाढ्य व्यवसायिकांच्या इमारतींनी रस्त्यांच्या सीमा ओलांडल्या आहेत. अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागांवर बेकायदेशीर बांधकामे आणि हॉल थाटले गेले आहेत. मात्र, या मोठ्या माशांवर कारवाई करण्याचे धाडस ना मनपा प्रशासनात दिसत आहे, ना लोकप्रतिनिधींमध्ये. त्यामुळे ही मोहीम केवळ सामान्य जनतेचा छळ करण्यासाठीच राबवली जात आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.
गरिबांच्या पोटावर पाय; पण धनदांडग्यांना सवलत!अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला आणि गरीब नागरिक आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी रस्त्या कडेला लहान-मोठ्या टपऱ्या किंवा खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून उदरनिर्वाह करतात. मनपाने त्यांना हक्काची पर्यायी जागा उपलब्ध करून न देता थेट रस्त्यावर उतरून त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, ज्या बड्या लोकांच्या अतिक्रमणामुळे शहरात खरी वाहतूक कोंडी होते, त्यांच्यावर साधी नोटीस बजावण्याचीही हिंमत प्रशासन दाखवत नाही. राजकीय दबावापोटी किंवा आर्थिक हितसंबंधांमुळे या बड्या लोकांच्या बेकायदेशीर बांधकामांकडे पूर्णपणे कानाडोळा केला जात असल्याची उघड चर्चा आता चौकाचौकात सुरू झाली आहे.
नियम सर्वांसाठी सारखेच ठेवा, महापौरांच्या या एकतर्फी कारवाईमुळे जळगावच्या नागरिकांमध्ये आणि छोट्या व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. “जर कायदा आणि नियम सर्वांसाठी समान असतील, तर सर्वात आधी शहरातील बड्या उद्योगपतींची आणि राजकीय नेत्यांची अतिक्रमणे का काढली जात नाहीत?” असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत. केवळ गरिबांच्या टपऱ्या तोडून शहर अतिक्रमण मुक्त होणार नाही, तर त्यासाठी शहरातील मोठ्या बांधकामांवरही बुलडोझर चालवावा लागेल.




