जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांचा उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते गौरव


जळगाव:दि.17 (धर्मेंद्र राजपूत) साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ यंदा जळगावचे सुपुत्र, प्रसिद्ध लेखक व चित्रकार राजू बाविस्कर यांच्या “काळ्या निळ्या रेषा” या आत्मचरित्राला जाहीर झाला आहे. या गौरवशाली यशामुळे जळगाव शहराच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून, संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
या ऐतिहासिक यशाची दखल घेत जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्वतः राजू बाविस्कर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. महानगरपालिकेच्या वतीने बाविस्कर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले की, “साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून, आपल्या जळगाव शहरासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. राजू बाविस्कर यांनी आपल्या लेखणीतून आणि कुंचल्यातून शहराची मान राष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
या सोहळ्याप्रसंगी हर्षल पाटील सर, विजय चौधरी, योगेश जाधव आणि कार्तिक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बाविस्कर यांच्या या यशामुळे स्थानिक साहित्यिकांमध्ये आणि कलाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




