

जळगाव :दि.25 शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच बाजूला महिलांचे वसतिगृह व कॉलेजच्या बाजूस तसेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक समोरील परिसरात लहान कचरा गाड्यांमधील कचरा मोठ्या गाड्यांमध्ये भरण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब निदर्शनास आली.

या प्रकाराची दखल घेत महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावण्यात आले.
यावेळी महापौर व उपमहापौर यांनी कॉलेज परिसरात सुरू असलेले कचरा हस्तांतरणाचे काम तात्काळ बंद करून ते अन्य योग्य ठिकाणी हलविण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही तसेच नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारे कचरा व्यवस्थापन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. त्यांनी परिसरातील दुर्गंधी व अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.




