महापौर ॲक्शन मोडमध्ये! जळगाव मनपाच्या प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्यांची हजेरी; लेटलतीफांचे धाबे दणाणले


जळगाव: धर्मेंद्र राजपूत दि.23 प्रशासकीय राजवट संपली असून आता जनतेचे सरकार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपली मनमानी सोडून शिस्त पाळावी,” असा सज्जड दम जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी आज दिला. महापालिका कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, महापौरांनी सोमवारी सकाळीच महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची अचानक हजेरी घेतली. महापौरांच्या या ‘सर्प्राईज व्हिजिट’मुळे विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली.
शिस्तीचा बडगा: आयकार्ड अनिवार्य
गेल्या काही काळापासून महापालिकेत कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे आणि कर्तव्यावर असताना ओळखपत्र (आयकार्ड) परिधान करत नसल्याचे समोर आले होते. आजच्या या मोहिमेत महापौरांनी स्वतः प्रवेशद्वारावर थांबून प्रत्येक कर्मचाऱ्याची चौकशी केली. जे कर्मचारी विलंबाने आले आणि ज्यांच्याकडे आयकार्ड नव्हते, अशांची महापौरांनी जागेवरच कानउघडणी केली. “जनतेच्या कामासाठी कर्मचारी वेळेवर उपस्थित असणे ही प्राथमिक गरज आहे,” असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
आता ‘मनमानी’ चालणार नाही!
प्रशासकीय काळात कर्मचाऱ्यांच्या कामकाजात शिथिलता आली होती, मात्र आता महापौरांनी थेट मैदानात उतरून शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. महापौरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. “येणाऱ्या काळातही अशाच प्रकारची औचक तपासणी सुरूच राहील. ज्यांना शिस्त पाळता येत नाही, त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल,” असा इशाराही महापौर दीपमाला काळे यांनी दिला आहे.
सकारात्मक बदल अपेक्षित
महापौरांच्या या पुढाकाराचे जळगावकर नागरिकांकडून स्वागत होत आहे. यामुळे महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि सामान्य जनतेची कामे विनाविलंब मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे



