जळगावच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावा; उपमहापौर मनोज चौधरींनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) दि.10 जळगाव शहरातील खोटे नगर आणि चंदू अण्णा नगर ( आव्हाने शिवारात ) परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरलेल्या डम्पिंग ग्राउंडच्या (कचरा डेपो) समस्या सोडवण्यासाठी जळगाव शहरचे उपमहापौर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. जळगाव शहराचे नवनियुक्त उपमहापौर मनोज चौधरी यांनी आज प्रत्यक्ष डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात, उपमहापौरांचा संताप
गेल्या अनेक वर्षांपासून या भागात कचरा साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वसनाचे विकार, त्वचारोग आणि दूषित पाणी यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. खोटे नगर, आव्हाने शिवार आणि चंदू अण्णा नगर सारख्या रहिवासी क्षेत्राच्या अगदी जवळ असलेल्या या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. या तक्रारींची दखल घेत उपमहापौरांनी पाहणी दरम्यान कामात दिरंगाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करणार
निवडणूक काळात मनोज चौधरी यांनी या परिसरातील नागरिकांना आश्वासन दिले होते की, निवडून आल्यानंतर डम्पिंग ग्राउंडच्या विल्हेवाटीला ते प्राधान्य देतील. आजच्या भेटीदरम्यान त्यांनी आपला हा शब्द पाळण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला. “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, कचरा प्रकल्प लवकरच अधिक चांगल्या आणि शास्त्रीय पद्धतीने कार्यान्वित करावा,” असे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
प्रकल्पात होणार मोठे बदल

उपमहापौर मनोज चौधरी यांनी डम्पिंग ग्राउंडची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कचरा डेपोचा नागरिकांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने हा प्रकल्प सक्षमपणे सुरू करण्यासाठी त्यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. या भेटीमुळे आता खोटे नगर आणि लगतच्या परिसरातील रहिवाशांना वर्षानुवर्षे सुरू असलेल्या त्रासातून मुक्तता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.




