युवतींच्या स्वप्नांना दिशा देणारे ‘नारी Verse’ युवती संमेलन उत्साहात संपन्न


जळगांव दि.7 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव जिल्ह्याच्या वतीने युवतींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘नारी Verse’ युवती संमेलन बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या संमेलनास युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने युवतींनी सहभाग नोंदविला.
‘शिक्षित, सशक्त, स्वावलंबी नारी’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनामध्ये युवतींच्या शैक्षणिक, सामाजिक, मानसिक आणि व्यावसायिक विकासासह त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करण्यावर भर देण्यात आला. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवतींनी विविध क्षेत्रांमध्ये आत्मविश्वासाने पुढे येऊन नेतृत्वाची भूमिका बजावावी, आपल्या क्षमता ओळखून स्वावलंबी व्हावे आणि समाजाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या संमेलनास जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सह्याद्री बिरले, उद्योजिका श्रीमती वंदना पाटील, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कीर्ती देशमुख, अभाविप केंद्रीय कार्यसमिती सदस्य कु. वैभवी ढिवरे, जळगाव विभाग संयोजक कु. गायत्री पाटील तसेच संमेलन प्रमुख कु. प्राची दाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संमेलनाच्या माध्यमातून महिलांचे शिक्षण, स्वावलंबन, उद्योजकता, मानसिक आरोग्य, आत्मविश्वास, सुरक्षितता आणि नेतृत्वक्षमता या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी निर्माण केलेल्या कर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवत युवतींनी केवळ स्वतःच्या प्रगतीपुरते मर्यादित न राहता कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय भूमिका बजावावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
आजच्या काळात शिक्षणासोबतच कौशल्य, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि मानसिक सक्षमता या बाबी युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर युवतींना स्वतःच्या ध्येयांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि उपलब्ध संधींचा प्रभावीपणे उपयोग करण्यासाठी ‘नारी Verse’ हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
संमेलनाला जळगाव शहरासह विविध भागांतून युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमामध्ये युवतींचा उत्साह आणि सक्रिय सहभाग दिसून आला. ‘स्वप्ने मोठी ठेवा, पावले मजबूत ठेवा’ या विचारातून युवतींनी आपल्या क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.
अभाविपच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘नारी Verse’ युवती संमेलन हे युवतींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, शिक्षित, सक्षम आणि स्वावलंबी युवती घडविण्याच्या व्यापक उद्दिष्टाला या उपक्रमातून बळ मिळाले.



