जळगावातील जैन इरिगेशन व शेतकऱ्यांच्या अनुभवातून मिळाली, १७ वर्षीय अंश जालानच्या ‘ फसलफॉरवर्ड ’ ला नवी दिशा

जळगांव दि.5: शेतमालाचा उद्याचा बाजारभाव किती असेल, याचा अंदाज घेणारे शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त असे मॉडेल विकसित करून त्याची चाचणी करण्यासाठी मुंबईहून जळगावात आलेल्या १७ वर्षीय बारावीत शिकणाऱ्या अंश जालान याने शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यात शेतकऱ्यांच्या सूचनांचा अभ्यास करण्यासाठी जैन इरिगेशनचे तंत्रज्ञान वापरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची प्रत्यक्ष शेतावर व घरी जाऊन त्याने भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांनी एका अत्यंत साध्या, पण महत्त्वाच्या प्रश्नाने त्याला विचार करायला भाग पाडले. “उद्याचा भाव कळण्यापेक्षा आम्हाला आधी आजचा भाव तरी सहज कळायला हवा,” अशी शेतकऱ्यांची भूमिका होती.

त्याच्या या ॲग्री ॲडव्हायजरसाठी जैन इरिगेशनच्या कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शन व अनुभवातून अंशच्या ‘ ॲग्री अॅडव्हायजर’ ( https://fasalforward.com/ ) या कृषी माहिती वेब व डिजिटल सेवेस नवी दिशा मिळाली. या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, माती, पीक, रोग-कीड, बाजारभाव आणि सल्ला याबद्दल रिअल-टाइम माहिती देऊन निर्णयक्षमता वाढवते. ही प्रणाली एसएमएस, मोबाईल ॲप्स , व्हाट्सअप ॲप्स आणि स्थानिक भाषांमधून शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन पोहोचवते.
मुंबईतील (फोर्ट) कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकणाऱ्या अंशने २९ मेपासून ही डिजिटल सेवा विकसित करण्यास सुरुवात केली. शेतमालाच्या किमतींचा अंदाज घेणे हा त्यामागील सुरुवातीचा मुख्य उद्देश होता. मात्र, जळगावातील काही दिवसांच्या वास्तव्यात शेतकरी आणि जैन इरिगेशनशी करार शेती, इतर उत्पादने केळी खरेदी करणाऱ्या व्यक्तींशी झालेल्या चर्चेतून त्याला कृषी क्षेत्रातील माहितीच्या उपलब्धतेची वेगळीच बाजू समोर आली.
अंदाजापेक्षा बाजारभावाची माहिती अधिक महत्त्वाची
हवामान, बाजारातील आवक, मागणी, शेतमालाची गुणवत्ता आणि स्थानिक परिस्थिती अशा अनेक घटकांवर कृषी उत्पादनांचे बाजारभाव अवलंबून असतात. त्यामुळे केवळ ऐतिहासिक आकडेवारीच्या आधारे भविष्यातील भावाचा अचूक अंदाज बांधणे आव्हानात्मक होय. त्याचवेळी अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाजारपेठांमधील त्या दिवसाचे दर सहज उपलब्ध होत नाहीत, ही अधिक मूलभूत समस्या अंशच्या लक्षात आली.
अंशच्या मते, “शेतकऱ्यांकडे सर्व आवश्यक माहिती उपलब्ध असेल आणि त्यांना मी देऊ शकणारी वेगळी गोष्ट म्हणजे भावाचा अंदाज असेल, असे मला वाटत होते. मात्र, जळगावातील शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर लक्षात आले की कृषी बाजार समित्या, बाजार संबंधित मूलभूत माहितीपर्यंतही अनेकांची सहज पोहोच नसते.” या गोष्टीला विचारात घेऊन ॲग्री ॲडव्हायझरमध्ये बदल करण्यात आला. भविष्यातील भावाचा अंदाज देण्याबरोबरच सध्याच्या बाजारभावाची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर आता ॲपवर भर आहे.

एगमार्कनेटच्या आकडेवारीवर आधारित माहिती
ॲग्री ॲडव्हायजर ही कृषीविषयक माहिती देणारी डिजिटल सेवा असून, त्यात केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी विपणन माहिती नेटवर्क ‘एगमार्कनेट’ (Agmarknet) कडून दररोज उपलब्ध होणारी शेत माल बाजार भावाची माहिती घेतली जाते. त्यासोबत हवामान, पेरणीसाठी योग्य कालावधी आणि पिकांशी संबंधित विविध सूचना देण्याची सुविधाही आहे. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील १८ पिकांचा त्यात समावेश केला आहे. माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये भावाचा अंदाज देणारे मॉडेलही कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, जळगावातील शेतकऱ्यांच्या प्रतिसादातून सर्वाधिक महत्त्वाची ठरलेली सुविधा म्हणजे विविध बाजारपेठांमधील सध्याचे दर एका ठिकाणी पाहण्याची सुविधा.
५० हजारांचा फरक दाखवणारा अनुभव
जळगाव दौऱ्यात अंशची एका शेतकऱ्याशी भेट झाली. त्या शेतकऱ्याने सुमारे ५० टन हरभरा विकला होता. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत बाजारभावात सुमारे १०० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली. ५०० क्विंटल उत्पादनासाठी हा फरक सुमारे ५० हजार रुपये इतका होता. भविष्यात बाजार भाव वाढतील असा अंदाज मला न घेता आल्याने मी लवकर विकल्याने माझे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे ही सेवा आम्हा शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असल्याचे संबंधीत शेतकऱ्याने अंशला सांगितले. बाजारपेठांमधील दरांची सहज तुलना करण्याचे साधन उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्याला माल विकण्याची वेळ ठरविताना मर्यादित माहितीवर अवलंबून राहावे लागले. या अनुभवामुळे अंशने हरभऱ्याचा समावेश देखील अॅग्री अॅडव्हायजरमध्ये केला.
मात्र, या उदाहरणातून एक महत्त्वाचे आव्हानही स्पष्ट झाले. सध्या तरी हरभऱ्याच्या भावाची संपूर्ण ऐतिहासिक माहिती अॅग्री अॅडव्हायजरवर प्रामुख्याने हरियाणा आणि पंजाबसाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्रासाठी अद्याप मर्यादित माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे देशभरातील सर्व बाजारपेठांमधून सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणे हे पुढील मोठे आव्हान आहे.

भावाच्या अंदाजाचीही होतेय कसोटी
शेतमालाच्या भावाचा अंदाज बांधताना केवळ अंदाज व्यक्त करणे पुरेसे नसते तर तो प्रत्यक्षात किती अचूक ठरतो, हे तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे अॅग्री अॅडव्हायजरमध्ये केलेल्या अंदाजांची प्रत्यक्ष बाजारभावाशी तुलना केली जाते. यासाठी १, ७, १४ आणि ३० दिवसांच्या कालावधीनंतर अंदाज आणि प्रत्यक्ष भावातील फरक नोंदविला जातो.
शेतकऱ्यांच्या माहितीच्या गरजेला नवी दिशा
अंशचा हा दौरा गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अंबिका जैन यांच्या पुढाकाराने करण्यात आला. या भेटीत अंश जालानने जैन इरिगेशनशी संबंधित केळी उत्पादक शेतकरी तसेच कंपनीच्या खरेदी व्यवस्थेशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधला. या संवादातून देशातील कृषी बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या व्याप्तीचा आणि सातत्याचा प्रश्नही पुढे आला. देशभरातील अधिकाधिक बाजारपेठांमधून विश्वसनीय बाजारभावाची माहिती एकत्रित करून ती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध करून देणारी व्यवस्था उभी राहिल्यास तिचा मोठा उपयोग होऊ शकतो, असे अंशला जाणवले.
“कृषी क्षेत्रात माहितीपर्यंत पोहोच किती मर्यादित आहे आणि ती काही मोजक्या लोकांपुरती कशी राहते, हे जळगावात मला समजले,” असे अंश सांगतो.
‘फसलफॉरवर्ड’चा प्रवास
ॲग्री ॲडव्हायजर अर्थात फसलफॉरवर्ड सध्या प्राथमिक टप्प्यातील विनामूल्य आहे. त्यावर जाहिराती नाहीत आणि सध्या कोणतेही सदस्यत्व अथवा महसूल मॉडेलही नाही. अधिकाधिक पिके आणि बाजारपेठांची माहिती अॅपमध्ये समाविष्ट करणे, तसेच भावाच्या अंदाजाची प्रत्यक्ष बाजारातील अचूकता तपासणे, यावर अंशचा सध्या भर आहे. जळगावात अंश उद्याचा बाजारभाव अधिक अचूकपणे सांगण्याचा मार्ग शोधण्यासाठी आला होता. मात्र, शेतकऱ्यांशी झालेल्या संवादातून त्याला कृषी माहितीच्या गरजेचा एक मूलभूत धडा मिळाला. उद्याचा भाव सांगण्यापूर्वी शेतकऱ्याला आजचा भाव सहज, अचूक आणि आपल्या भाषेत कळणे अधिक गरजेचे आहे. ही दिशा मिळाल्यामुळे त्याच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली असे अंश म्हणतो.
आई-वडिलांकडून अंशला मिळाली प्रेरणा
अंश जालानच्या पालकांनी त्याला दिलेल्या प्रेरणेतून त्याची वाटचाल घडू शकली. वडील सुमित जालान हे युबीएस मध्ये वरिष्ठ गुंतवणूक बँकर असून सामाजिक योगदानाची जाणीव त्यांनी दिली. त्याची आई नेहा जालान या ग्लोबल लीडरशिप कोच आहेत. त्याच्यात आवड आणि सामाजिक उद्देश यांची सांगड घालण्याची प्रेरणा आईकडून मिळाली. या दोन्ही प्रभावांमुळे अंशचे संगणक तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि उद्योजकतेतील कुतूहल वाढले. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तंत्रज्ञानातून उपाय शोधण्यासाठी त्याने अॅग्री अॅडव्हायजर ‘फसलफॉरवर्ड’ ही संकल्पना विकसित केली. कल्पनेपासून अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास अंशचा स्वतःचा आहे.
यांच्या लेखणीतून 📝
किशोर कुळकर्णी, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन जळगाव




