राज्य

नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ जळगाव जिल्ह्यात जनआंदोलन म्हणून राबविण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे आवाहन

संत-महंत, लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक व सेवाभावी संस्थांचा सक्रिय सहभाग

जळगाव, दि. ९ ऑगस्ट २०२६ :“युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, ही शक्ती नशेपासून दूर ठेवून शिक्षण, क्रीडा, कौशल्य, रोजगार, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याकडे वळविणे ही काळाची गरज आहे. ‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ हे केवळ शासकीय अभियान न राहता व्यापक जनआंदोलनाच्या स्वरूपात राबविले जावे,” असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्षाताई खडसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करत अभियानाची उद्दिष्टे आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच नशामुक्त समाजनिर्मितीसाठी व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले.

‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ हे १०० आठवडे चालणारे राष्ट्रव्यापी जनआंदोलन असून, युवकांना नशेच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवणे आणि सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ चे स्वप्न साकार करण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी, सक्षम आणि सशक्त पिढी घडविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील युवकांमध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून त्यांना सकारात्मक आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

नशेचे वाढते दुष्परिणाम रोखण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसून जनजागृती, समुपदेशन, कुटुंबाचा सहभाग, शैक्षणिक संस्थांची भूमिका आणि समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. युवा पिढीला नशेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना क्रीडा, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि सकारात्मक सामाजिक उपक्रमांशी जोडण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नशामुक्तीचा संदेश जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक युवकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी संत-महंत, धार्मिक संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस विभाग, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनातून सुरू झालेल्या या राष्ट्रव्यापी अभियानाला जळगाव जिल्ह्यात व्यापक जनसहभागातून बळ देत, युवकांना व्यसनमुक्त, निरोगी, सक्षम आणि राष्ट्रनिर्माणासाठी सज्ज करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले.

यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह संत-महंत, लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, सेवाभावी संस्था, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

 

नशामुक्त युवा हीच विकसित भारताची खरी ताकद आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच्या युवा पिढीला नशामुक्त, शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सक्षम बनविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button