मोकाट कुत्र्यांचा उच्छाद कायम; कासमवाडीत साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचे तोडले लचके


जळगाव:दि.29 (धर्मेंद्र राजपूत) शहरातील कासमवाडी परिसरात एका मोकाट कुत्र्याने अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालकावर जीवघेणा हल्ला केल्याची थरारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मोहम्मद मिर्झा असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे गल्लीत लहान मुलांसोबत खेळत असताना अचानक आलेल्या एका कुत्र्याने मोहम्मदवर झडप घातली आणि त्याला जमिनीवर पाडून त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोहम्मदचा जीव वाचला असला, तरी तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जळगाव शहरातील नागरिकांचा महापालिका प्रशासनाविरोधात आणि विशेषतः आरोग्य विभागाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
या अत्यंत गंभीर घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरातून महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर कडाडून टीका होत आहे. भाजपाचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागातील एकूणच कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. नगरसेवक अरविंद देशमुख यांनी मनपा प्रशासनाला स्थायी समितीच्या सभेत थेट आरसा दाखवला
कागदावरच टेंडर; जमिनीवर फक्त शून्य कारवाई?
जळगाव महानगरपालिका प्रशासनाने शहरात वाढणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, निर्बीजीकरणासाठी आणि शेल्टर होम उभारण्यासाठी लाखो रुपयांच्या निविदा (टेंडर) काढल्या आहेत. मात्र, या टेंडरचे पुढे काय झाले? हा निधी जातो कुठे? असा थेट प्रश्न आता जळगावकर विचारत आहेत. प्रशासनाचे टेंडर फक्त कागदावरच मर्यादित असून प्रत्यक्षात रस्त्यावर मात्र कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. महापालिकेच्या या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे निष्पाप बालकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाला अजून किती बळी हवेत?
कासमवाडीतील या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट इतका वाढला आहे की, पालकांना आता आपल्या लहान मुलांना घराबाहेर खेळायला पाठवणे किंवा शाळेत सोडणेही कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच जळगावात कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत, तरीही महापालिकेचा आरोग्य विभाग अजूनही गाढ झोपेतच आहे का? असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.




