राजकीयराज्य

मोदी सरकारची १२ वर्षे : सेवा, सुशासन, विकास आणि जनकल्याणाची अभूतपूर्व वाटचाल – केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे

जळगाव,(धर्मेंद्र राजपूत )दि.१६ जून २०२६:– पंतप्रधान  नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत देशाच्या विकासाला नवी दिशा देत सेवा, सुशासन, विश्वास आणि जनकल्याणाचा आदर्श निर्माण केला आहे. या १२ वर्षांच्या कालखंडात भारताने आर्थिक, सामाजिक, पायाभूत सुविधा, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सांस्कृतिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली असून विकसित भारताच्या दिशेने देश आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री  रक्षाताई खडसे यांनी केले.

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी श्रीमती रक्षाताई खडसे म्हणाल्या की, २०१४ मध्ये देशवासीयांनी  नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, २०१९ मध्ये अधिक मोठा जनादेश दिला आणि २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब केले. मोदी सरकारने “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या मंत्रानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचे कार्य केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, जनधन योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, जल जीवन मिशन, पीएम किसान सन्मान निधी, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी आणि पीएम विश्वकर्मा यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीमुळे लाखो कोटी रुपयांची गळती रोखण्यात यश आले असून पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची नवी ओळख निर्माण झाली आहे.

देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत मोदी सरकारने ठोस आणि निर्णायक भूमिका घेतली आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर यांसारख्या कारवायांमुळे भारताची जागतिक स्तरावरची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवत देशांतर्गत सुरक्षा बळकट करण्यात यश आले आहे.

विकासाच्या क्षेत्रात गेल्या १२ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले असून रेल्वेचे आधुनिकीकरण, वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत स्टेशन योजना, मेट्रो प्रकल्प, विमानतळांचा विस्तार आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल घडले आहेत. ग्रामीण भागात लाखो किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करून विकासाची गंगा शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्यात आली आहे.

श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी लखपती दीदी, सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजना तसेच विविध स्वयंरोजगार योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत लाखो कोटी रुपयांची मदत थेट खात्यात जमा करण्यात आली असून किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून स्वस्त कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सांस्कृतिक वारशाच्या जतनासोबतच राष्ट्रीय अस्मिता आणि गौरव जागविण्यासाठी कर्तव्य पथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नवीन संसद भवन, पंचतीर्थ, जनजातीय गौरव दिवस यांसारखे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. भारताने जागतिक स्तरावरही आपले नेतृत्व सिद्ध केले असून जी-२० अध्यक्षपदाचे यशस्वी आयोजन, ‘वॅक्सीन मैत्री’ उपक्रम आणि वाढती परकीय गुंतवणूक यामुळे भारत जगाच्या विश्वासाचे केंद्र बनला आहे.

पत्रकार परिषदेत श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले की, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून आगामी काळातही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक वेगाने काम केले जाईल.

यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, भाजपा जळगांव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, जळगांव महापौर दिपमाला काळे, विजय वानखेडे, मनोज भंडारकर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button