जळगाव: पिंप्राळा स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण व सिमेंट बेंचचे लोकार्पण; पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश


जळगाव:दि.11 (धर्मेंद्र राजपूत) शहराच्या पर्यावरण रक्षणासाठी आणि स्मशानभूमी परिसराच्या सुशोभीकरणासाठी बुधवारी पिंप्राळा स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण आणि सिमेंट बेंच लोकार्पण उत्साहात संपन्न झाला. स्व.मोतीभाऊ जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, नगरसेवक अमरभाऊ जैन यांच्या सौजन्याने आणि श्रद्धेय भवरलालजी व कांताई जैन फाऊंडेशन तसेच जळगाव शहर महानगरपालिका यांच्या विशेष सहकार्याने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाला जळगावच्या महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच स्थायी समिती सभापती डाॅ.चंद्रशेखर पाटील, माजी महापौर सौ.सिमाताई भोळे, नगरसेवक अमर भाऊ जैन, नरेंद्र पाटील,अतुल बारी, विवेक सोनार,
सागर पाटील, प्रथमेष भार्गव, सागर मराठे,जाकीर पठाण, एन.जी.पाटील,सह मान्यवरांच्या हस्ते स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ‘जैन फाऊंडेशन’तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या ५० वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी बसवण्यात आलेल्या सिमेंट बेंचचेही यावेळी लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी अमरभाऊ जैन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी वृक्षारोपण करून तिथले वातावरण पवित्र आणि सुखद करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




