

जळगाव दि.13(धर्मेंद्र राजपूत):राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष शिक्षक आघाडीच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यातील ४५ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जळगाव येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सोहळा पार पडला.
मान्यवरांचा सत्कार आणि दीपप्रज्वलन
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सोहळ्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडीच्या वतीने त्यांना मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला.

शिक्षकांकडून कामे करून घेता आणि ‘टीटी’ची सक्ती करता?;
खडसेंचा सरकारला जाब: आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार एकनाथराव खडसे यांनी शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांवरून महाराष्ट्र सरकारवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “युवा पिढी घडवण्यामध्ये शिक्षक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सध्याचे सरकार शिक्षकांकडून सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे करून घेते. हे कमी म्हणून की काय, आता शिक्षक २० वर्षांपूर्वी लागलेला असो की आज लागलेला, त्यांना ‘टीटी’ (TET) सारखी परीक्षा सक्तीची केली जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. या अन्यायाविरोधात येणाऱ्या विधानपरिषद अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल.” शिक्षकांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमीच खंबीरपणे पाठीशी राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या मान्यवरांची लाभली उपस्थिती
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, प्रदेश सरचिटणीस इजाज मलिक, जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस.लाडवंजारी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस.महाजन सर, विकास पवार, डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, राजू मोरे, किरण राजपूत, सुनील माळी, विनायक पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रोहिणीताई खडसे-खेवलकर, इजाजभाई मलिक, भास्करराव काळे आणि वाय. एस. महाजन सर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला.




