राजकीयस्थानिक बातम्या

जळगांव:आकाशवाणी चौकात नगरसेविका वैशाली पाटलांची ‘ऑपरेशन खड्डेमुक्त’ मोहीम!

शब्द दिला होता… शब्द पूर्ण केला: वैशाली अमित पाटील नगरसेविका

जळगाव दि.20 (धर्मेंद्र राजपूत) प्रशासनाच्या ‘तारीख पे तारीख’ आणि टोलवाटोलवीला कंटाळलेल्या जळगावकरांना अखेर दिलासा मिळाला! त्याचे महत्वाचे कारण म्हणजे नगरसेविका वैशाली अमित पाटील ह्या आहेत. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील जीवघेण्या खड्ड्यांमुळे आता पर्यंत अनेक अपघात झाले आहे. तर अनेकदा निष्पाप नागरिकांचा जीव येजा करतांना धोक्यातच राहत होता. अधिकारी मात्र केवळ आश्वासनांचे खेळ खेळत होते.पण जेव्हा प्रश्न नागरिकांच्या सुरक्षेचा येतो, तेव्हा लोकप्रतिनिधीने कसं वागावं, याचं जिवंत उदाहरण नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी दाखवून दिलं आहे! दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री स्वखर्चाने आकाशवाणी चौकात मोठा व मजबूत एम-३० दर्जाचा काँक्रीट रॅम्प तयार करून जीवघेणे खड्डे बुजविले.यावेळी  नगरसेविका वैशाली अमित पाटील नगरसेवक नितीन सपके ,नगरसेवक अमर जैन आणि परिसरातील जागरूक नागरिक त्याच्या सोबत उपस्तितीत होते.

शब्द दिला होता… शब्द पूर्ण केला

त्याचे झाले असे की जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील खड्ड्यांमध्ये यापूर्वी माती टाकण्यात आली होती. मात्र, पावसामुळे ती माती वाहून गेल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली होती. या ठिकाणी वृद्ध नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण होते. या गंभीर प्रश्नाबाबत वार्ड क्र:13 च्या नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी मागील आठवड्यात मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रोहनजी घुगे, आयुक्त आदित्यजी जीवने तसेच संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित असताना हा विषय अत्यंत गांभीर्याने मांडण्यात आला.

 

त्यावेळी संबंधित रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असल्याचे सांगण्यात आले. एनएचएआयकडे पत्रव्यवहार केला असून लवकरच कार्यवाही होईल, असे आश्वासन देण्यात आले.

 

मात्र, त्यानंतरही नागरिकांच्या समस्येवर प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. कधी “हा रस्ता आमच्या अखत्यारित नाही”, तर कधी “तो त्यांच्या विभागाकडे आहे”, तर कधी “पाऊस असल्याने काम करता येत नाही” अशी उत्तरे देत प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत होती.

 

प्रश्न रस्ता कोणाच्या अखत्यारित आहे हा नव्हता… प्रश्न नागरिकांच्या जीवाचा होता! अखेर वैशाली पाटील रस्त्यावर उतरल्या!

नागरिकांचा वाढता संताप आणि संभाव्य मोठ्या दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे बुधवारी रात्री संपूर्ण यंत्रणेसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.

रात्री सुमारे ११ वाजता जेसीबी, १२ कर्मचारी आणि काँक्रीट मिक्सरसह कामाला सुरुवात करण्यात आली. प्रथम खराब झालेला भाग योग्य प्रकारे साफ करून नियोजनबद्ध पद्धतीने एम-३० दर्जाच्या काँक्रीटचा मजबूत रॅम्प तयार करण्यात आला. पहाटे सुमारे ३ वाजेपर्यंत हे काम सुरू होते.

 

फक्त आकाशवाणी चौकच नाही… जीवघेण्या स्पॉटवरही तातडीची डागडुजी

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केवळ आकाशवाणी चौकापुरते काम मर्यादित ठेवण्यात आले नाही.

🔹त्यानंतर दत्त मंदिरासमोरील मोठे खड्डे बुजविण्यात आले

🔹इच्छादेवी चौफुलीकडील मार्गावरील धोकादायक भागाची दुरुस्ती करण्यात आली

🔹 विशाल पेट्रोलियमसमोर / रिलायन्स पेट्रोल पंपाच्या परिसरातील अतिशय मोठा जीवघेणा खड्डा बुजविण्यात आला

🔹 मुख्य मार्गावरील धोकादायक ठिकाणी तातडीची डागडुजी करण्यात आला.

हा मार्ग केवळ प्रभाग क्रमांक १३ साठीच महत्त्वाचा नसून महाबळ कॉलनी, मोहाडी, शिरसोली, पाचोरा रोड, रामानंद नगर, रायसोनी नगर, नेहरू नगर, आदर्श नगर, साने गुरुजी कॉलनी, नित्यानंद नगर, मोहन नगर, साखरवाडी तसेच परिसरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रमुख मार्ग आहे.

 

“मी जनतेला शब्द दिला होता की खड्डे बुजवू. प्रशासनाच्या कार्यवाहीची वाट पाहत आम्ही अनेक दिवस थांबलो. वरिष्ठ नेत्यांपासून जिल्हाधिकारी आणि आयुक्तांपर्यंत सर्वांच्या निदर्शनास हा प्रश्न आणला. आश्वासने मिळाली; मात्र रस्त्यावर नागरिकांचा जीव रोज धोक्यात होता. त्यामुळे अखेर मी ठरविले—आता प्रतीक्षा नाही, आता कृती! माझ्या प्रभागातील किंवा या मार्गावरून जाणाऱ्या एका जरी नागरिकाचा अपघात झाला तरी मी स्वतःला माफ करू शकले नसते. म्हणून स्वखर्चाने हे काम केले. जनतेला दिलेला शब्द हा केवळ पोस्ट किंवा भाषणासाठी नसतो; तो पूर्ण करण्यासाठी असतो.”

रात्रीच्या मोहिमेत अनेक कार्यकर्त्यांची मेहनत

या कामात नगरसेविका वैशाली अमित पाटील, नगरसेवक नितीन प्रभाकर सपके, नगरसेवक अमर जैन यांच्यासह रवींद्र उर्फ बाळू पाटील, विजय चौधरी, निखिल पाटील, अविनाश नारखेडे, स्वप्निल शेळके, गजानन इंगळे, विवेक जगदाळे, धनराज भंगाळे तसेच प्रभागातील असंख्य नागरिक आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कामात सहभागी सर्व सहकाऱ्यांचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button