नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील
डोळ्यांच्या प्रकाशासाठी पनवेलकडे १०५ रुग्णांची वाटचाल : GPS मित्र परिवाराचा उपक्रम

पाळधी/धरणगाव / जळगाव (धर्मेंद्र राजपूत) दि. ३१ मे – “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून समाजातील गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेच्या उपक्रमाचे आयोजन करताना मला खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान मिळते. कुणाच्यातरी जीवनात प्रकाश पेरण्याचा हा खरा दिव्य अनुभव आहे. गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला पुढे काम करण्याची नवी ऊर्जा मिळते. जनतेच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहीन, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाळधी येथे GPS मित्र परिवार आणि गुलाबरावजी पाटील फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर आयोजित केले होते. त्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी त्यांच्या उपस्थितीत पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी १०५ पात्र रुग्णांना सन्मानपूर्वक रवाना करण्यात आले. या उपक्रमात पनवेल येथील डॉ. सुदेश पाटील, डॉ. सुजय कोल्हापुरे , डॉ.अर्पिता जाधव, डॉ.प्रिया साळवी , चंदन चौधरी, प्रकाश पाटील आणि राहुल चौधरी यांच्या तज्ज्ञ टीमने ३०५ रुग्णांची तपासणी केली. त्यात १०५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या रुग्णांना लक्झरी आणि चारचाकी वाहनांतून पनवेल येथे रवाना करण्यात आले असून, पुढील दोन दिवसांत आधुनिक पद्धतीने त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन होणार आहे. या शिबिराचे आयोजन मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील , विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली GPS ग्रुप व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन मार्फत करण्यात आले. रुग्णांच्या राहण्याची, जेवणाची व औषधोपचारांची संपूर्ण जबाबदारी GPS मित्र परिवाराने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे. हे कार्य केवळ सामाजिक नव्हे, तर मानवी मूल्यांची जपणूक करणारे आहे.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी GPS ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले व त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रतापरव पाटील, सरपंच विजय पाटील, धनराज कासट, चंदन कळमकर, संजय महाजन, प्रशांत झवर, दिनेश कडूसे, अनिल माळी, दिलीप माळी, आबा माळी, नारायण आप्पा सोनवणे, बळीराम सपकाळे, मच्छिंद्र कोळी, प्रशांत पाटील, अरुण पाटील, अमोल पाटील, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
दरवर्षी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते ३ वेळा अशा नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करून शेकडो गरजूंना जीवनात नवा प्रकाश देणारे हे कार्य, जनतेच्या सेवेसाठी निःस्वार्थपणे झटणाऱ्या नेतृत्वाचे उदाहरण ठरते. या उपक्रमातून समाजात माणुसकी, दया आणि करुणेची नवी ऊर्जा पसरते. याचा जिवंत अनुभव आज पाळधीच्या भूमीत सर्वांनी घेतला.