पाच हजाराची लाच घेतांना,ग्रामसेवकासह रोजगार सेवकाला ACB च्या पथकाने केली अटक

जळगांव दि. 24 (Jalgaon Times ) मंजूर असलेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा आणि गट नंबर नमुना आठ मिळावा. या करीता पाच हजारांची लाच घेणाऱ्या मांडकी येथील ग्रामसेवक सोनीराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. भडगाव) व रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. भडगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त, तक्रारदार हे भडगाव तालुक्यातील मांडकी येथील असून त्यांना घरकुल मंजूर आहे. त्या घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा आणि गट नंबर नमूना आठ मिळावा या करीता ग्रामसेवक व रोजगार सेवकाने त्यांच्याकडे सहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. पडताळणी केल्यानंतर तडजोडी अंती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव कडून सापळा रचला होता. त्यानंतर पाच हजारांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेवक सोनीराम शिरसाठ व रोजगार सेवक जितेंद्र चौधरी यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकुर, पोलीस निरीक्षक नेहा सुर्यवंशी, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, विलास पाटील, सुभाष पावरा यांच्या पथकाने केली.