महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई व्हावी आ.राजूमामा भोळे यांचे राज्यपालांना पत्र
जळगाव दि.10 (धर्मेंद्र राजपूत) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे शहरात अपघातांच्या प्रमाण वाढलेले आहे. महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच बायपास व समांतर रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून कामास गती देण्यात यावी, अशी मागणी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे जळगाव दौऱ्यावर आले आहेत. आ. राजूमामा भोळे यांनी राज्यपालांची भेट घेवून जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. यात जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवर होणाऱ्या अपघातांकडे त्यांनी राज्यपालांकडे लक्ष वेधले. तसेच जळगाव औद्योगिक क्षेत्रातील विद्युत वितरण विभागाच्या आरडीएसएस योजनेंतर्गत मंजूर प्रकल्पांच्या कामांना गती मिळावी, जळगाव शहरात नवीन औद्योगिक क्षेत्र उभारून, नवीन औद्योगिक प्रकल्प आणणे, जळगाव जिल्ह्यातील पतसंस्था ठेवीदारांना शासनामार्फत पॅकेज मंजूर करून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, कोरोना काळात ज्या आशा सेविकांनी कार्य केलेले आहे, त्यांना सेवेत कायम करण्यात यावे, सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना वेतन वाढी संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही होणेसाठी आदेश द्यावेत अशा या मागण्या राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आ. लताताई सोनवणे, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.