राजकीयआरोग्यस्थानिक बातम्या

उत्सवाच्या खर्चातून पाळधीला कायमची हिरवाई; GPS परिवाराचा उपक्रम समाजासाठी आदर्श : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाळधी, जळगाव(धर्मेंद्र राजपूत) दि.14 : उत्सवाचा आनंद काही दिवसांचा असतो; मात्र त्या उत्सवातून गावासाठी निर्माण झालेली सुविधा अनेक वर्षे समाजाच्या उपयोगी पडते. गणपती व नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून त्याच निधीतून गावासाठी सुंदर बगीचा उभारण्याचा GPS मित्र परिवाराचा निर्णय हा सामाजिक भान जपणारा आणि इतरांसाठी अनुकरणीय उपक्रम आहे. दोन-चार दिवसांच्या रोषणाईपेक्षा त्याच खर्चातून गावासाठी कायमस्वरूपी सुविधा निर्माण झाली, तर उत्सवाला खऱ्या अर्थाने सामाजिक अधिष्ठान मिळते. GPS परिवाराने सेवा ही केवळ घोषणेत न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

गणपती उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा; आकर्षक बगीच्यासह ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती

 

पाळधी खु. येथे बहिणाबाई मार्ट जवळ, स्मशानभूमीच्या पुढील परिसरात उभारण्यात येणाऱ्या आकर्षक बगीच्याचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

पालकमंत्र्यांच्या सूचनेतून व युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संकल्पना व प्रयत्नातून GPS मित्र परिवाराने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या बगीच्यात पर्यावरणपूरक ‘ऑक्सिजन पार्क’ विकसित करण्यात येणार असून, लहान मुलांसाठी खेळण्याची, ज्येष्ठांसाठी फेरफटका व विरंगुळ्याची तसेच महिला व नागरिकांसाठी प्रसन्न आणि आरोग्यदायी वातावरणात वेळ घालविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याच प्रसंगी पाळधीकरांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फॉगिंग मशीनही उपलब्ध करून दिली. डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी या मशीनचा गावातील नियमित फवारणीसाठी उपयोग होणार आहे.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, “आज या बगीच्याच्या रूपाने आपण केवळ सौंदर्यीकरण करत नाही, तर पुढच्या पिढीसाठी आनंदाची, आरोग्याची आणि मोकळ्या श्वासाची जागा निर्माण करत आहोत. उत्सवाच्या खर्चाला विधायक दिशा देऊन समाजासाठी कायमस्वरूपी मालमत्ता उभी करण्याचा GPS परिवाराचा विचार कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे गावाची एकजूट, पर्यावरणा विषयीची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी अधिक मजबूत होते.

 

GPS परिवाराची ओळखच ‘गरज ओळखा आणि कृती करा’

GPS मित्र परिवाराच्या विविध सामाजिक उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना पालकमंत्री म्हणाले की, “समाजात समस्या सांगणारे अनेक असतात; मात्र त्या समस्येवर प्रत्यक्ष उपाय उभा करणारे हात महत्त्वाचे असतात. GPS परिवाराने हीच भूमिका सातत्याने निभावली आहे. कुठे पाण्याची गरज असेल तर जलसंधारण, कुणाला दृष्टीची गरज असेल तर नेत्रसेवा, वारकऱ्यांसाठी सेवा, संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदत आणि निराधार-गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आधार—प्रत्येक वेळी या परिवाराने समाजाची गरज ओळखून पुढाकार घेतला आहे. GPS मित्र परिवाराने यापूर्वी नदी-नाला खोलीकरण व जलसंधारण, फिरत्या नेत्रसेवेद्वारे तपासणी व उपचार, वारकरी सेवा, पूरग्रस्त कुटुंबांना मदत तसेच निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणासाठी आधार अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांतून सेवाभावाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याच सेवाभावी वाटचालीत आता उत्सवाच्या खर्चातून बगीचा आणि ऑक्सिजन पार्क उभारण्याचा उपक्रम आणखी एक नावीन्यपूर्ण पर्व ठरणार आहे.

प्रतापराव पाटील यांनी मांडली बगीच्याची संकल्पना

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी GPS मित्र परिवारामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. गणपती व नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन तो निधी गावासाठी कायमस्वरूपी उपयोगी ठरणाऱ्या कामासाठी वापरण्याची संकल्पना कशी पुढे आली, बगीच्याची रचना, प्रस्तावित ऑक्सिजन पार्क, नागरिकांना होणारा उपयोग आणि भविष्यातील देखभाल याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

 

या भूमिपूजन सोहळ्यास उद्योगपती शरद कासट, उद्योगपती सुनील झंवर,सिद्धिविनायक महागणपतीचे चेअरमन श्रीकांतजी मणियार, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, पाळधी बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच विजू बापू, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, माजी उपसभापती दिनकर पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिलीप पाटील, उद्योजक दिलीप पाटील, अनिल कासट, श्रीकृष्ण साळुंखे, अलीम देशमुख, गोपाल सोनवणे, उपसरपंच अकबर खान, सावकार पठाण, सनवर सेठ, चंदू माळी, राजू भाट, माजी सभापती संजय रामदास पाटील, आरिफ देशपांडे, हारून बागवान, सिद्धिविनायक महागणपतीचे चेअरमन श्रीकांतजी मणियार, नाना पाटील सर यांच्यासह GPS मित्र परिवाराचे सदस्य, ग्रामस्थ व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण माळी यांनी केले, तर आभार प्रशांत झंवर यांनी मानले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button