‘त्या’ प्लास्टिक टबमध्ये होतं संपूर्ण कुटुंबायचं काळीज… अमळनेरमध्ये देवदूतांनी १ महिन्याच्या बाळाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं!
अमळनेर आरोग्य व अग्निशमन कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या बाळाला सुखरूप पुरातून बाहेर काढले


अमळनेर दि.31 जळगांव जिल्हातील अमळनेर मध्ये मुसळधार पावसामुळे शहरात हाहाकार माजलेला असतानाच, अमळनेरच्या बहाद्दर अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावत एका, एका महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या कुटुंबाला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. भालेराव नगरमधील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला आलेल्या भीषण पुराच्या छातीभर पाण्यातून हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन पार पडले. या देवदूतांच्या शौर्याचे संपूर्ण अमळनेर तालुक्यातून कौतुक होत आहे.
घरात शिरलं पाणी; खाटेवर उभं राहून मृत्यूशी झुंज
भालेराव नगरमधील गुरुकृपा कॉलनी परिसरातील नाल्याला अचानक आलेल्या महापुराने रौद्ररूप धारण केले होते. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे परिसरातील घरांना पाण्याचा वेढा पडला. एका घरात अवघ्या एक महिन्याचं बाळ, त्याची आई, ३ लहान मुले आणि इतर महिलांसह एक तरुण अडकले होते. बघता बघता पाणी घरात शिरले आणि थेट छातीपर्यंत पोहोचले. हतबल झालेले कुटुंब जी वाचवण्यासाठी घरातील खाट आणि पलंगावर उंच जागेवर उभे राहून थरथरत्या कापायने मदतीची याचना करत होते.
मुख्याधिकाऱ्यांची तत्परता, पथक रवाना
या अत्यंत गंभीर घटनेची माहिती मिळताच अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अजिबात वेळ न दवडता तातडीने रेस्क्यू टीमला घटनास्थळाकडे रवाना केले.
जेव्हा मानवी साखळी बनवून ‘ते’ पुरात उतरले…
आरोग्य निरीक्षक किरण कंडारे व गोल्डी बिऱ्हाडे, तसेच अग्निशमन दलाचे जवान फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका संदांनशीव आणि पवन बिऱ्हाडे घटनास्थळी पोहोचले. पण पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की थेट पुढे जाणे अशक्य होते. कर्मचाऱ्यांनी तात्काळ दोर आणि लाईफ जॅकेट्स मागवले. पाण्याच्या भयानक प्रवाहात एकमेकांचे हात पकडून जवानांनी ‘मानवी साखळी’ (Human Chain) तयार केली आणि मृत्यूच्या प्रवाहाशी दोन हात करत पुढे सरकले.
टबमध्ये विसावलं ‘ते’ इवलंंसं बाळ; २ तासांचा थरार यशस्वी!
तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हे पथक पीडित कुटुंबापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. सर्वात मोठे आव्हान होते त्या १ महिन्याच्या नवजात बालकाला सुरक्षित बाहेर काढणे. जवानांनी अत्यंत काळजीपूर्वक एका प्लास्टिकच्या टबमध्ये त्या इवल्याशा बाळाला ठेवले. एका हाताने टब पाण्याचा वर धरत आणि दुसऱ्या हाताने कुटुंबाला सावरत जवानांनी बाळाच्या आईसह ३ महिला, ३ लहान मुले आणि एका तरुणाला पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. या सर्वांना शेजारील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षित हलवण्यात आले.अमळनेरकरांचा सलाम!”आम्ही आमची मुलं सुखरूप पाहू असं वाटलं नव्हतं, आमच्यासाठी हे कर्मचारी देव म्हणूनच धावून आले,” अशी प्रतिक्रिया बाळाच्या माऊलीने डोळ्यात अश्रू आणून दिली. दोन तास चाललेल्या या मृत्यूच्या थरारावर अखेर माणुसकीने आणि शौर्याने मात केली. अमळनेर नगरपालिकेच्या या शूर कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत असून सोशल मीडियावरही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.




