रेड अलर्ट’ मध्ये जळगावची ‘नवी पेठ’ पाण्यात; लोकप्रतिनिधी गायब, महापालिकेचा कारभार रामभरोसे!


जळगाव (धर्मेंद्र राजपूत)दि.30: हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्यानंतर आज जळगांव शहरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, मोठ्या पावसात जळगाव महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची संपूर्ण पोलखोल झाली आहे. शहराच्या मध्यभागात आणि अत्यंत गजबजलेल्या नवी पेठ परिसरातील सरस्वती डेअरी जवळ रस्त्याला चक्क तलावाचे स्वरूप आले असून संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे.
कॅमेऱ्यात कैद झाली वाहनधारकांची ‘कसरत’
नवी पेठ भागात गुडघाभर पाणी साचल्यामुळे या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे मृत्यूशी खेळ खेळण्यासारखे झाले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात अडकत असून, वाहनधारकांना आपली वाहने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अतोनात कसरत करावी लागत आहे. अनेक दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने गाड्या भर रस्त्यात बंद पडत आहेत. या दृश्यांवरून जळगावच्या स्मार्ट कारभाराची धिंडवडे निघत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नगरसेवक फक्त निवडणुकीपुरतेच का?
या भागातील नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा संताप आता अनावर झाला आहे. “प्रभागातील नगरसेवक फक्त मते मागायला आणि फ्लेक्सवर फोटो लावायलाच आहेत का?” असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी हीच बिकट परिस्थिती निर्माण होते, तरीही येथील नगरसेवकांनी हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत कोणतीही ठोस पावले का उचलली नाहीत? जनतेच्या टॅक्सच्या पैशांवर निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी अशा संकटसमयी नेमके कुठे गायब आहेत, असा सवाल आता जनता उघडपणे विचारत आहे.
महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभारकेवळ नगरसेवकच नव्हे, तर जळगाव महानगरपालिका प्रशासनही या दुरवस्थेला तितकेच जबाबदार आहे. कोट्यवधी रुपयांची भुयारी गटारे आणि नालेसफाईचे दावे कागदावरच मर्यादित राहिल्याचे या दृश्यांवरून स्पष्ट होते. सरस्वती डेअरीजवळ पाणी साचण्याचा जुना प्रश्न असतानाही, महापालिकेच्या इंजिनिअर्सनी आणि आयुक्तांनी या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही कायमस्वरूपी यंत्रणा का उभारली नाही?
महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा नवी पेठेत पाणी साचण्यापासून रोखू शकली नाही. व्यापारपेठेचे हृदय मानल्या जाणाऱ्या नवी पेठेत जर ही अवस्था असेल, तर इतर उपनगरांचे काय? आता तरी महापालिका प्रशासन झोपेतून जागे होणार आणि नगरसेवक त्यांचे कर्तव्य पार पाडणार हेच पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे




