राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर
जळगाव,दि.०३ ऑक्टोबर २०२३ (जिमाका) – राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच २०६८ ग्रामपंचायतीमधील २९५० सदस्य पदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत.
जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूका ; १२८ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक
जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत १२८ रिक्त पदांसाठी निवडणूका होणार आहेत. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
आचारसंहिता लागू, पहा सर्व महत्वाच्या तारखा
सदर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून मंगळवार (दि. ३ ऑक्टोबर) आचारसंहिता लागू झाली आहे. १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होईल. २५ ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
२५ ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख ५ नोव्हेंबर असणार आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. गडचिरोली आणि गोंदिया या भागात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. तर ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
अशी माहिती जिल्हा माहिती जळगांव च्या जिल्हा माहिती कार्यालय कडून मिळाली.