मुक्ताईनगर (धर्मेंद्र राजपूत ) : अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मुक्ताईनगर विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांना जाहिर पाठिंबा देण्यात आला असून, बोदवड, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील समाज घटकांनी ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याचे पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांची मुक्ताईनगर येथे प्रचार सभा संपन्न झाली यावेळी सभेच्या व्यासपीठावर मराठा सेवा संघाचे स्थानिक पदाधिकारी दिपकराज पाटील, धीरज पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, भूषण पाटील, निलेश बेलदार, अजय पाटील यांनी ॲड.रोहिणी खडसे यांना मराठा सेवा संघाचा जाहीर पाठिंबा दर्शवत पाठिंब्याचे पत्र सुपुर्द केले.
सदर पत्रकात नमुद करण्यात आले आहे की, मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांचा शैक्षणिक, व्यावसायिक, शेती विषयक व नोकरी क्षेत्रात तसेच आरोग्य या बाबी लक्षात घेता समाजाचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टीकोनातून महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांना अखिल भारतीय मराठा महासंघ मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातर्फे जाहिर पाठिंबा दर्शवत आहोत.
माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मागील काळात मराठा समाजासाठी बहुमूल्य कार्य केलेले आहे. त्यात शेती व्यवसाय व समाजातील शिक्षित तरूणांना नोकरी, रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. तसेच वेळोवेळी मराठा समाजासाठी विधिमंडळात आवाजदेखील उठवला आहे. या बाबी लक्षात घेऊन त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांचे हात बळकट करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तीनही तालुक्यातर्फे जाहीर बिनशर्त पाठिंबा देत असून समाज घटकांनी रोहिणी खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जाहिर पाठिंबा दर्शविल्याबद्दल ॲड. रोहिणी खडसे यांनी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे आभार व्यक्त करून, सदोदित समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या, तरुणांच्या उन्नतीसाठी आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.