जयश्री महाजन यांना महिलांची प्रेमाची मिठी; महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणार – जयश्री महाजन
जळगाव (धर्मेंद्र राजपूत ) : शहराला सुरक्षित करण्यासाठी मी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन जयश्री महाजन यांनी आज (दि.१०) प्रचार रॅली दरम्यान प्रभाग क्रमांक ८ मधील महिलांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेदरम्यान केले. आज दि.१० सकाळच्या सत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचार फेरी काढली होती. सकाळी भोईटे नगरमधील गणपती मंदीरात दर्शन घेऊन प्रचार फेरीचा शुभारंभ झाला. त्यानंतर प्रेमनगर परिसर, मुक्ताईनगर, गुजराल पेट्रोलपंप परिसर या मार्गे दादावाडी येथील श्रीराम मंदीरात प्रचार फेरीची समाप्ती झाली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराची भव्य रॅली आज भोइटे नगर ते गुजराल पेट्रोल पंप मार्गे काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी जयश्री महाजन यांचे औक्षण करून त्यांना मिठी मारत आपले प्रेम व्यक्त केले. यावेळी महिलांनी त्यांच्यासमोर महिला सुरक्षेचा मुद्दा मांडला व त्यावर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली. जयश्री महाजन यांनी या भावनिक संवादानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले. जळगाव शहराला सुरक्षित बनवण्यासाठी मी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
पुढे त्या म्हणाल्या की, महिलांच्या समस्या एक महिलाच समजू शकते. एक महिला ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी व संरक्षणासाठी प्रसंगी रणरागिणी बनते. त्याप्रमाणे जळगाव शहर हे माझे कुटुंब असून, जळगावकर महिलांच्या रक्षणासाठी त्यांच्या सुविधांसाठी प्रसंगी कठोर उपाययोजना करण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. महिला – मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेऊन जळगावकर मुली व महिला आपल्या हक्कांसाठी रणरागिणी झाल्या तर या शहराचा विकास कोणीही रोखू शकणार नाही. यापूर्वीही महापौर असतांना शहरात महिलांच्या सुविधांसाठी हिरकणी कक्ष तसेच सुलभ प्रसाधनगृहांची उभारणी केली होती. मात्र महिला जर शहरात असुरक्षित वाटत असेल तर पूर्ण प्रयत्नांनीशी मी शहरात महिला सुरक्षेचे वातावरण निर्माण करून महिलांना सुरक्षित आणि सशक्त बनवण्याच्या हेतूने माझ्या कार्याची दिशा असेल.
या रॅलीमध्ये शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख जितू साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष किरण राजपूत, शिवसेना विभाग प्रमुख किरण भावसार, संजय सांगळे, उमेश चौधरी, निलेश ठाकरे, गणेश गायकवाड, संतोष नाना पाटील, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगरप्रमुख निता सांगोळे, जया तिवारी, माजी नगरसेवक दुर्गेश पाटील, संदेश भोईटे, पप्पू तायडे आदी प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.