“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसंदर्भात अंगणवाडी सेविकांची बैठक
जळगाव (धर्मेंद्र राजपूत) : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसंदर्भात गुरुवारी अंगणवाडी सेविका यांची महानगरपालिका येथे आमदार. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षम होत असून त्यामुळे परिवार सक्षम पर्यायाने समाज व देश सक्षम होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज न केलेल्या बहिणींनी देखील तत्काळ अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज भरावा. म्हणजॆ त्यांना लाभ मिळेल, असे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले.
महानगरपालिका येथे दुसऱ्या मजल्यावर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसंदर्भात गुरुवारी बैठक उत्साहात पार पडली. यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, गणेश चाटे, सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, सुमित जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी गायत्री पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. अंगणवाडी ताईंनी त्यांना आलेल्या विविध अनुभवांची माहिती दिली.
तसेच, या योजनेमुळे महिलांना आर्थिक हातभार लागत असल्याने त्यांनी राज्य सरकारचे आभार मानल्याचेही अनुभव अंगणवाडी सेविकांनी सांगितले.बैठकीत आ. राजूमामा भोळे यांनी येणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात जाणून घेतले. तसेच, योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बहिणींच्या अर्जावर लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनीदेखील समस्या जाणून घेऊन जर प्रक्रियेत काही त्रुटी असतील तर लवकरच दूर केल्या जातील असे आश्वासित केले.