वाघुर धरणाचे झाले जलपूजन:आमदार सुरेश भोळे म्हणाले येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मिटविणार !
जळगाव, दि.४ (धर्मेंद्र राजपूत) : जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघुर धरण यंदा सततच्या पावसामुळे शंभर टक्के भरले आहे. वरुणराजाची कृपा असल्याने शहरापासून 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा भरल्याने सर्वत्र आनंद होत आहे.त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून बुधवारी शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी सपत्निक अर्थात माजी महापौर सौ.सीमाताई सुरेश भोळे दोघांनी धरणस्थळी साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले.
आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सौ.सीमाताई भोळे यांच्याद्वारे वाघूर धरण जलपूजन
यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता. याप्रसंगी आ.राजूमामा भाळे यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव 100 टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली. वाघूर धरणाचे बांधकाम 1978 मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते चार वेळा 100 टक्के भरले आहे. पुढील दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून नागरिकांची जलचिंता ही मिटनार आहे.