26 सप्टेंबर रोजी सकल बंजारा समाजाचा मोर्चा, बंजारा समाजालाही आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हास्तरीय बैठक

जळगाव,14 सप्टेंबर –हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने (दि. 14 सप्टेंबर, रविवार) जळगाव शहरातील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय बैठक पार पडली.
या बैठकीत जळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, 26 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनावर चर्चा केली. आरक्षणासाठी होणारा हा मोर्चा कसा यशस्वी करता येईल यावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत ठरविण्यात आले की, प्रत्येक तालुक्यातून व प्रत्येक तांड्यातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे. यावेळी उपस्थित नेत्यांनी समाजाच्या हक्कासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले.
26 सप्टेंबर रोजीचा हा मोर्चा जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या ताकदीचे दर्शन घडवणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.ही भावना “आरक्षण कृती समिती, जळगाव जिल्हा” तर्फे व्यक्त करण्यात आली.