गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे शिक्षणासमोरील आव्हाने विषयावर चर्चासत्रांत मान्यवरांचा सूर
जळगाव दि.१६ (धर्मेंद्र राजपूत)- मुलांचे भविष्य घडविण्याच्या प्रयत्नात त्यांचे वर्तमानातील बालपण आपण हरवित आहोत. सामाजिकस्तरावर स्थैर्य न ठेवता सरकार, समाज आणि शिक्षणातील बाजारीकरणामुळे सर्वच जण अस्वस्थ आहेत. शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक, पालक सर्वच जण वैचारिकदृष्ट्या तणावात आहेत. त्यामुळे शिक्षणाकडे फक्त नोकरी, व्यवसाय किंवा उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता चारित्र्यशील आणि कुशल समाजाची निर्मितीचे साधन म्हणून शिक्षणाकडे बघितले पाहिजे. शिक्षणाद्वारे स्वस्थ व सुसंस्कृत समाज निर्मितीचे आव्हान आपल्या समोर असल्याचा सूर उमटला. त्यावर उपाय हा की, प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे त्यादृष्टीने ज्यानेत्याने महत्त्वाची भूमिका निभवावी, असे विचार गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘भारत में शिक्षा की चुनौतियाँ’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.
शिक्षणाद्वारे स्वस्थ व सुसंस्कृत समाज निर्मितीचे आव्हान!
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तूरबा सभागृहात झालेल्या चर्चासत्रात तरुण शांती सेनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भार्गव, गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चचे माजी संचालक डॉ. लीला वसारिया, सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशनचे व्याख्याता डॉ. विकास मणियार व हॅडलबर्ग विद्यापीठ जर्मनीच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. गीता धर्मपाल सहभागी झालेत. चर्चासत्राचे संचालन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अयंगार यांनी केले. शहरातील संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी खुल्या चर्चासत्रात प्रश्नोत्तराद्वारे सहभाग घेतला.
डॉ. लीला वसारिया यांनी मुलींचे शिक्षण व रोजगाराची निर्मितीतील त्यांचे स्थान यावर भाष्य केले. २१ ते २८ वयोगटातील मुलींना रोजगाराच्या दृष्टीने शिक्षण मिळत नाही आणि शिक्षण मिळाले तरी कौटुंबिक जबाबदारांमुळे त्याचा उपयोग पाहिजे तेवढा करता येत नाही.
अशोक भार्गव यांनी सांगितले की, मुलं हे नैसर्गिकदृष्ट्या शिकतात. त्यांचा मेंदू हा प्रत्येक गोष्ट आत्मसात करत असतो. परंतु बालपणातच आपण त्यांच्यातील कुतुहल, प्रयोगशीलता, सृजनशिलता ह्या तीन गोष्टी हिरावून घेतो. त्यामुळे अवघा दोन टक्के समाज हा सृजनशील आणि सक्षम बनू शकतो. मिरर न्यूरॉन आणि महात्मा गांधी न्यूरॉन या दोन संकल्पनाही त्यांनी सोदाहरण सांगितल्या.
डॉ. विकास मणियार म्हणाले, शिक्षणाचा कोणाला फायदा होतो, त्याचा उद्देश काय, शिक्षण देणारं कोण आहे या तीन प्रश्नांचा आधार घेत आजच्या शिक्षण व्यवस्थेतील राजकारण त्यांनी सांगितले. यात सरकार, समाज आणि बाजार यावर निर्भर असलेल्या शिक्षण पद्धतीचा ऊहापोह ही त्यांनी केला. समाजात समानता निर्माण होणारे शिक्षण असावे असे ही ते म्हणाले.
प्रो. डॉ. गीता धरमपाल यांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविणारे शिक्षण हवे. आध्यात्मिक, मानसिकदृष्ट्या सक्षम करणारे शिक्षण हेच खरे विकसीत शिक्षणाचे लक्षण आहे. भारतीय शिक्षण पद्धती आणि यूरोपीयन शिक्षण पद्धतीचा भेद त्यांनी उलगडून सांगितला.डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी तलाठी, ग्रामसेवक या पदासाठी पीएचडी धारकांचे अर्ज येणे हे समाज स्वास्थाचे उदाहरण नव्हे असे सांगून शिक्षीत हे संस्कारशील असतीलच असे नाही तर अशिक्षीतसुद्धा संस्कारी असू शकतात.सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले. गिरीष कुळकर्णी यांनी आभार मानले.
डॉ. प्रभा रवि शंकर यांचे उद्या व्याख्यान
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कस्तूरबा सभागृह येथे उद्या दि. १८ जुलै रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान डॉ. प्रभा रवि शंकर यांचे व्याख्यान आजोजित केले आहे. महादेवभाई देसाई एक परिपूर्ण स्वीय सहाय्यक या विषयावर ते मार्गदर्शन करतील. महादेवभाई देसाई हे महात्मा गांधींचे स्वीय सचिव आणि जवळचे मदतनीस होते. १९१७ ते १९४२ अशी २५ वर्षे त्यांनी महात्मा गांधीजींची समर्पित सेवा केली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. डॉ. प्रभा रवि शंकर या योगदानाविषयी आणि त्यांच्या आयुष्यातील बारीकसारीक पैलूंविषयी भाष्य करतील. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन यांनी केले.