संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण
जळगाव दि. १३ (धर्मेंद्र राजपूत) – संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि. १४ फेब्रुवारीला होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना प्राप्त झाले आहे. धुळे येथील स्वामी नारायण मंदिराचे प्रमुख आनंद स्वामीजी महाराज यांनी हे निमंत्रण अशोक जैन यांना प्रत्यक्ष येऊन सन्मानपुर्वक दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करून मा. अशोक जैन हे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थितीत राहणार आहेत.
अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी १३.५ एकर जमीन दान केली होती. मंदिराच्या बांधकामासाठी ४०० दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे. अबू मुरीकाह जिल्ह्यातील बीएपीएस हिंदू मंदिर हे २७ एकरमध्ये विस्तारले आहे. बीएपीएस हिंदू मंदिर हे दगडापासून बनवलेले मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे. गुलाबी राजस्थानी खडक व पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडापासून ते मंदिर बनवलेलं आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी अबूधाबीला नेले. मंदिराचे सात स्पायर्स प्रत्येक युएईच्या अमिरातीचे प्रतीक आहे. मंदिराच्या संकुलात अभ्यास केंद्र, प्रार्थना हॉल, थीमॅटिक गार्डन, शिक्षण क्षेत्र यांचा समावेश आहे. भूकंपाची शक्यता व तापमान बदल तपासण्यासाठी मंदिराच्या पायामध्ये १०० सेन्सर बसवण्यात आले आहेत.
मा. अशोक जैन भाऊ यांची प्रतिक्रिया
‘अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अनुभवल्यानंतर अबुधाबीतील श्री स्वामीनारायण मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाले. ही हृदय पुलकित करणारी घटना असून बीएपीएस मंदिराची भव्य रचना ही भारत व संयूक्त अमिराती यांच्यातील सांस्कृतिक सौहार्दाचे व मैत्रीचा पुरावा म्हणता येईल’, अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी व्यक्त केली.