मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे साहित्यिकांसह रसिकांमध्ये मोठी उत्सुकता
अमळनेर:(धर्मेद्र राजपूत) अवघ्या एका दिवसावर येवून ठेपलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे आलेली आहे.मुख्य सभा मंडपासह उर्वरित दोन सभागृहांची उभारणी पूर्ण झाली आहे. मुख्य सभागृहातील व्यासपीठ तयार झाले असून,उर्वरित दोन सभागृहांच्या व्यासपीठांची उभारणी सुरू आहे. दरम्यान,उद्या 1 फेब्रुवारी रोजी बालसाहित्य संमेलनास प्रारंभ होणार आहे.
साहित्य संमेलनानिमित्ताने अमळनेर शहराच्या विविध मार्गांवर विविध सामाजिक संस्थांनी स्वागत कमानी उभारून अमळनेर शहरात येणाऱ्या विविध साहित्यिकांचे स्वागत केले आहे. दरम्यान, अमळनेर नगर परिषदेतर्फे साहित्य संमेलन स्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची साफसफाई करण्यात आली असून, रस्तेही चांगले करण्यात आलेले आहेत, तर पथदिव्यांचीही दुरुस्ती केली आहे.
शुकवार, दि.2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संमेलनासाठी 1 फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत राज्यभरातील मराठी साहित्यिक, रसिकगण, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्ष्ाक दाखल होणार आहेत.
पूर्वनोंदणीनुसार निवास व्यवस्था
संमेलनास येणाऱ्या राज्यभरातील प्रतिनिधींची निवासाची व्यवस्था पूर्वनोंदणीनुसार करण्यात आलेली आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ, मराठी वाङ्मय मंडळ,प्रताप महाविद्यालय यांच्या विविध समितींकडून तयारी पूर्णत्वाकडे नेली जात आहे.