रामोत्सव : जळगावात ‘आपली आस्था…आपले मंदिर’ अंतर्गत स्वच्छता अभियानास प्रारंभ
जळगाव, दि. १२ :(धर्मेंद्र राजपूत) उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये प्रभु श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. यानिमित्ताने आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या मार्गदर्शनाने शहरातील १५० हून अधिक मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्याचा बिडा हाती घेतला आहे. आज दि. १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता इच्छादेवी मंदिरापासून ‘आपली आस्था…आपले मंदिर’ अंतर्गत स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानाचे उद्घाटन आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते शुभारंभ : १५० हून अधिक मंदिरात होणार स्वच्छता अभियान
जळगावात संपूर्ण ठिकाणी अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठाबाबत चैतन्य निर्माण झाले असून ‘आपली आस्था…आपले मंदिर’ या श्रमदानांतर्गत माता इच्छादेवी यांचे दर्शन घेऊन आरती करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला. शहरातील धार्मिक स्थळांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून संपूर्ण जळगावात भक्तीमय आणि राममय वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा दिनी परिसरातील सर्व घराघरात श्री राम ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अयोध्येत जय्यत तयारी सुरू असून सर्व जळगाववासीयांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही गरज भासल्यास राजूमामा संपर्क कार्यालयात संपर्क साधावा असेही राजूमामा यावेळी म्हणाले.
यावेळी आ. सुरेश भोळे व मित्र परिवार यांच्याबरोबर विनोद मराठे, दीपक बाविस्कर, लताताई वैराट, कोकिळा ढगे, रवींद्र जगताप, संपत कोळी यासह आधींची लक्षणीय उपस्थिती होती.
अनेकांनी या श्रद्धेच्या ऐतिहासिक सोहळ्यात सक्रिय भूमिका बजावण्याची तयारी दर्शवली आहे. या ‘आपली आस्था…आपले मंदिर’ या श्रमदानांतर्गत स्वच्छता अभियान शृंखलेत शहरातील ५ मंदिर सजावट, प्रमुख ८ ठिकाणी भव्य एलईडी स्क्रीनव्दारे अयोध्या सोहळ्याचे थेट प्रेक्षपण, आणि शालेयस्तरावर श्रीरामरक्षास्तोत्र स्पर्धा घेण्यात येणार आहे.