जळगाव येथील शिव महापुराण कथास्थळी ८०,५०० ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप
जळगांव दि. १० (धर्मेंद्र राजपूत) – तालुक्यातील वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी मंदिर परिसरात पंडित प्रदिप मिश्रा यांच्याद्वारे शिवमहापुराण कथा सुरू आहे. शिवपुराण ऐकण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशासह संपूर्ण भारतातून लाखो भाविक कथेचा लाभ घेत आहेत. या कथेसाठी येणाऱ्या भाविकांची भोजनाची गैरसोय होऊ नये यासाठी ‘स्नेहाची शिदोरी’ देण्यात येत आहे.
भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्यातर्फे ५ डिसेंबर पासून तर उद्या (ता.११) च्या समाप्ती पर्यंत रोज ११,५०० स्नेहाची शिदोरी वाटप करण्यात येत आहे. याचा एकूण ८०,५०० भाविकांनी ‘स्नेहाची शिदोरी’ लाभ घेतला. भाविकांसह यापरिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांनाही ही शिदोरी दिली जात आहे.
भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्यावतीने ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम कोरोना काळात सुरू करण्यात आला. जळगाव शहरात कुणीही उपाशी राहू नये हा ध्यास श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता आणि याची पूर्तता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी डिसेंबर २० पासून ही ‘स्नेहाची शिदोरी’ अविरत सुरू ठेवण्याचा निर्णय जाहिर केला होता त्यानुसार ही शिदोरी सुरू आहे. कांताई सभागृह येथे आताही दिवसाला १४०० पाकिटे वाटप केली जातात. आतापर्यंत २३ लाख १३ हजार ७९ आवश्यकता असणाऱ्यांना शिदोरी वाटप करण्यात आली आहे.