राजकीयराज्य

ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह परत कधी मिळणार? आगामी महानगरपालिका निवडणुकाही नव्या चिन्हावरच?

अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी जाहीर केला. या निर्णयानुसार अंधेरीतील पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला नुसतं शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही.

या निर्णयानंतर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे हा चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय नेमका कधीपर्यंत लागू असेल? ठाकरे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह पुन्हा मिळेल का? यासारख्या प्रश्नासंदर्भात संभ्रम जनतेच्या मनात आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये चर्चेत असणाऱ्या या प्रश्नांना ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उत्तरं दिली आहेत.

एका खासगी वृत्तवाहिनीला रविवारी सायंकाळी दिलेल्या मुलाखतीमध्ये बापट यांनी निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्यासंदर्भातील निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विवेचन केलं. “नाव आणि चिन्ह गोठवलं आहे हे तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं आहे तर पुन्हा शिवसेनेला ते नाव आणि चिन्हं मिळू शकतं का?” असा प्रश्न या मुलाखतीमध्ये बापट यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना बापट यांनी, “हा प्रश्न मला अनेक वृत्तवाहिन्या आणि विद्यार्थी विचारत आहेत.

हा तात्पुरता निर्णय आहे. जोपर्यंत शिवसेना कोणाची याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग देत नाही तोपर्यंत हा निर्णय लागू राहील. ही चिन्हं आताच्या निवडणुकीत पण राहतील. त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पण राहतील. थोडक्यात काय तर निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत हा निर्णय लागू राहील,” अशी माहिती दिली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button