जळगावच्या कायदा व सुव्यवस्थेला मिळणार नवे बळ: संदीप गावित यांची अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत)दि.11 राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलीस दलात पदोन्नती आणि बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये जळगाव शहर विभागाचे माजी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) संदीप गावित यांची पदोन्नतीने जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगावशी जुने नाते आणि उत्तम कार्यकाळ पाहता संदीप गावित यांच्यासाठी जळगाव जिल्हा नवीन नाही. यापूर्वी त्यांनी जळगाव शहर विभागात उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वाची कामे केली आहेत.
शिस्तप्रिय प्रशासन: कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करत पोलीस दलात शिस्त निर्माण केली.प्रोत्साहन उपक्रम: ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ सारखे उपक्रम राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा गौरव केला, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत झाली.
गुन्हे नियंत्रण: शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. जळगाव शहराची भौगोलिक परिस्थिती आणि येथील गुन्हेगारीचे स्वरूप यांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. आता अप्पर पोलीस अधीक्षक या वरिष्ठ पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने, जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला अधिक गती मिळेल आणि गुन्हेगारांवर वचक बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या नियुक्तीचे जळगावच्या नागरिकांकडून आणि पोलीस दलाकडून स्वागत करण्यात येत आहे.




