आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा ; उपमहापौर मनोज सुरेश चौधरी संतप्त, स्वतः पुढाकार घेऊन केली साफसफाई


जळगाव, दि 6 : शुक्रवारी सकाळी जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ फेरफटका मारला असता अत्यंत धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली. आयुक्तांच्या बंगल्याच्या गेटसमोर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून आला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा कचरा मागील ७ ते ८ दिवसांपासून तसाच पडून आहे.उपमहापौरांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला असता, “येथे नियमित साफसफाई होत नाही, अनेक दिवसांपासून कोणीही कर्मचारी आलेले नाहीत,” अशी तक्रार नागरिकांनी केली. ही गंभीर बाब लक्षात येताच उपमहापौरांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून जाब विचारला.

अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपमहापौर मनोज चौधरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “आयुक्तांच्या बंगल्याजवळच अशी दुर्दशा असेल, तर संपूर्ण शहराची परिस्थिती काय असेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “आयुक्त रोज या मार्गाने ये-जा करतात, तरी त्यांना हा कचरा दिसत नाही का?” असा थेट प्रश्नही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
दरम्यान यावेळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी स्वतः पुढाकार घेत आयुक्तांच्या बंगल्यासमोरील कचऱ्याची साफसफाई करून प्रशासनाला आरसा दाखवला. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
उपमहापौरांनी संबंधित विभागाला तात्काळ कचरा उचलण्याचे आदेश देत, शहरातील साफसफाई व्यवस्थेवर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच, या प्रकरणात जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.शहरातील स्वच्छता व्यवस्थेबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही उपमहापौरांनी यावेळी दिला.




