स्थानिक बातम्याआरोग्य

रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!

जळगाव, दि.२४ (धर्मेंद्र राजपूत) : जळगाव शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या रस्ता राहिला नसून तो अधिकृत ‘कचरा डेपो’ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुना जकात नका जळगाव शहराच्या हद्दीत असणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरून नेहमी मोठी वर्दळ असतानाही प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

 

मेहरुण तलावामुळे शिरसोली रस्ता निसर्गरम्य परिसर बनला. या रस्त्याचे सिमेंट क्रॉक्रीटीकरण झाले आहे. या रस्त्यावर अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि जैन हिल्ससारखी महत्वाच्या संस्था आहेत. तसेच मंगल कार्यालयसुद्धा आहे. जैन हिल्सवर नेहमी असंख्य शेतकरी व इतर मान्यवरांची वर्दळ असते. पाचोरा, चाळीसगावसह नाशिक-पुणे शहराकडे जाण्यासाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या काही भागात सामाजिक संघटनांनी वृक्षरोपण केले आहे. परंतु रस्त्यांच्या बाजूला टाकलेल्या कचऱ्यामुळे सुंदर रस्ता भकास होत आहे. जोरदार हवेमुळे उडून अनेकवेळा कचरा उडून रस्त्यावर येतो. तसेच वाहन धारकांच्या डोळ्यातही जातो. त्यामुळे अपघातही होत असतात.

प्रशासनाचे मौन?

या रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. ‘स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव’च्या घोषणा देणारे प्रशासन शिरसोली रस्त्याच्या या विद्रुपीकरणावर गप्प का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दंडात्मक कारवाईची भीती नसल्यामुळेच कचरा टाकणाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

रस्त्याच्या कडेला साचलेल्या या कचऱ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच भयानक होण्याची शक्यता आहे. रस्ता सुंदर करण्याऐवजी तो भकास करणाऱ्या या प्रवृत्तींना चाप लावणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button