क्राईम

धुळे: अंगणवाडी कामाच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या जि.प.अधीक्षकास ३ वर्षे सक्त मजुरी

धुळे : दि.19 (धर्मेंद्र राजपूत) शासकीय कामात पारदर्शकता राखण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या धडाकेबाज कारवाईला मोठे यश मिळाले आहे. अंगणवाडीच्या बांधकामात सहकार्य करण्यासाठी कंत्राटदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या धुळे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन कार्यालयीन अधीक्षकास न्यायालयाने ०३ वर्षे सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडीच्या कामात ठेकेदाराला सहकार्य करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या धुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक पंकज विक्रम पाटील याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. धुळे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याना ०३ वर्षे सक्त मजुरी आणि १०,००० रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

हे प्रकरण २०१६ मधील आहे. तक्रारदार यांनी शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील अंगणवाडीचे काम वेळेवर पूर्ण केले नव्हते. या कारणास्तव उप अभियंता, बांधकाम उपविभाग, शिंदखेडा यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. यावेळी पंकज विक्रम पाटील यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

एसीबीची कारवाई आणि निकाल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) १६ सप्टेंबर २०१६ रोजी सापळा रचून पाटील याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. एम. तापकीरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे पंकज पाटील याला दोषी ठरवून खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

कलम ७ अन्वये: ३ वर्षे सक्त मजुरी आणि १०,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास).

कलम १३(१)(ड) सह १३(२) अन्वये: ३ वर्षे सक्त मजुरी आणि १०,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास).

या कारवाईत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोंदरे आणि धुळे एसीबीचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काम पाहिले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री. देवेंद्र तवर यांनी काम पाहिले.

नागरिकांना आवाहन: कोणत्याही शासकीय कामासाठी कुणी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबीच्या १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button