जळगावकर मुलींसाठी कवचकुंडले; ५ ते ७ हजारांची कॅन्सर प्रतिबंधक लस आता महापालिकेतर्फे ‘मोफत’


जळगाव: महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जळगाव शहर महानगरपालिका सरसावली आहे. या जीवघेण्या आजारापासून मुलींचे संरक्षण करण्यासाठी शहरात एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात ५ ते ७ हजार रुपयांना मिळणारी ही महागडी लस आता १४ वर्षांवरील मुलींना मोफत दिली जाणार आहे.
छत्रपती श्री शाहू रुग्णालयात मोहिमेचा श्रीगणेशा
जळगाव येथील छत्रपती श्रीशाहू हॉस्पिटलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात या मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून आरोग्यदूत म्हणून मुलींना प्रोत्साहित करण्यात आले.
आरोग्य सुरक्षिततेचा महत्त्वाचा टप्पा
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांच्या आरोग्यापुढील मोठे संकट मानले जाते. योग्य वयात ही लस घेतल्यास या आजाराला रोखणे शक्य आहे. सामान्यांना परवडणारी नसलेली ही लस शासनाने मोफत उपलब्ध करून दिल्याने अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना याचा मोठा फायदा होणार आहे. “महिलांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल आणि भविष्यातही अशा जनकल्याणकारी योजनांना महापालिका प्राधान्य देईल,” असा विश्वास यावेळी प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रशासनाचे आवाहन
जळगाव शहरातील १४ वर्षांवरील सर्व पात्र मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जवळच्या केंद्रावर जाऊन ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.




