क्राईमस्थानिक बातम्या

‘दक्षता’ पंपावरील सव्वा कोटींच्या डल्लाप्रकरणी PSI वाघ अखेर शरण; मुलालाही बेड्या

जळगाव: संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या ‘दक्षता’ पेट्रोल पंप अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस उपनिरीक्षक (PSI) वाल्मीक वाघ यांच्या मुसक्या अखेर आवळल्या गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या वाघ यांनी वाढत्या दबावामुळे सोमवारी शरणागती पत्करली. विशेष म्हणजे, या महाघोटाळ्यात पित्यासोबत मुलाचाही सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी शेखर वाघ यालाही अटक केली आहे.

 

जळगाव पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘दक्षता’ पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकपदाची धुरा वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. पोलिसांच्या कल्याणासाठी चालवल्या जाणाऱ्या या पंपाच्या हिशोबात घोळ असल्याचा संशय आल्यानंतर ऑडिट करण्यात आले. या लेखापरीक्षणात तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांची प्रचंड तफावत समोर आली. विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याऐवजी वाघ यांनी सरकारी पैशांवर डल्ला मारल्याचे कळतंय ?

फरार PSI अखेर शरण

गुन्हा दाखल झाल्यापासून PSI वाल्मीक वाघ फरार होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना केली होती. अटकेची खात्री आणि पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याने वाघ यांनी अखेर स्थानिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. तपासाधिकारी राहुल गायकवाड यांनी वाघ यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली.

बापाच्या गुन्ह्यात मुलाचाही ‘हात’?

या १.३३ कोटींच्या अपहारामध्ये केवळ वाल्मीक वाघच नाही, तर त्यांचा मुलगा शेखर वाघ याचाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी मुलालाही या प्रकरणात सहआरोपी करत बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस दलात खळबळ

खाकी वर्दीत राहून पोलीस दलाच्याच संस्थेला चुना लावल्याने या घटनेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. शिस्तप्रिय पोलीस दलातील एका अधिकाऱ्यानेच कोट्यवधींचा अपहार केल्यामुळे विभागाची प्रतिमा मलीन झाली असून, आता या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे पुढील तपासात स्पष्ट होईल.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button