गरिबांच्या लेकरांची शाळा ‘स्मार्ट’ होणार का? जळगावच्या महापालिका शाळांचे पुनरुज्जीवन हीच काळाची गरज!


जळगाव:Jalgaon Times (धर्मेंद्र राजपूत) दि. 10 आजच्या युगात सगळीकडे डोळे दिपवणाऱ्या खासगी इंग्लिश मीडियम शाळांची मोठी मोठी संकुले उभी राहिली आहेत. मात्र, या चकाकीमध्ये सर्वसामान्य कष्टकरी, मजूर आणि गरिबांच्या मुलांच्या हक्काच्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळा दुर्लक्षित होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ‘गरिबाच्या मुलांनी शिकायचे कुठे?’ हा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरपालिकेच्या शाळांना गतवैभव मिळवून देणे आणि लोकप्रतिनिधींनी त्यात पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जळगाव महापालिका शाळा: एक सक्षम पर्याय?
जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या शहरात अनेक शाळा आहेत.आधुनिक शिक्षण पद्धती सोबत डिजिटल युगासोबत शिक्षण व्यवस्थापन बदलण्याची, जळगाव महापालिकेच्या मालिकेच्या या शाळांच्या इमारती प्रशस्त आहेत, पण गरज आहे ती त्यामध्ये आधुनिक सुविधा आणि दर्जेदार शिक्षणाची भर घालण्याची. जर खासगी शाळांसारखे डिजिटल क्लासरूम्स, सुसज्ज प्रयोगशाळा आणि क्रीडांगणे महापालिका शाळांमध्ये उपलब्ध झाली, तर गरिबातील गरीब मुलगाही आत्मविश्वासाने शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहील.
लोकप्रतिनिधींना आवाहन: राजकारण बाजूला ठेवून शिक्षणावर लक्ष द्या!
नगरसेवक, आमदार आणि खासदारांना ही विनंती आहे की, त्यांनी आपल्या निधीचा एक मोठा हिस्सा या शाळांच्या विकासासाठी खर्च करावा. गरिबांची मुले केवळ पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत. शाळांची दुरुस्ती, पुरेसे शिक्षक आणि शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करून देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून ते एक ‘पुण्यकर्म’ आहे.
सरकारी शाळा आपली ताकद आहे!
पालकांनो, खचून जाऊ नका. जरी आज चित्र आव्हानात्मक वाटत असले, तरी सरकारी शाळांमध्ये शिकूनच अनेक महान व्यक्तींनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. आपण जागरूक नागरिक म्हणून आपल्या भागातील महापालिका शाळेच्या गुणवत्तेसाठी प्रशासनाकडे जाब विचारला पाहिजे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा घटनादत्त अधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी समाज म्हणून आपण एकत्र उभे राहूया.
भविष्यातील उपाययोजना काय असाव्यात?
दत्तक योजना: शहरातील दानशूर व्यक्ती आणि उद्योजकांनी महापालिकेची एक शाळा दत्तक घेऊन तेथे सुविधा पुरवाव्यात.मात्र गरिबांसाठी शैक्षणिक खर्च हे विनामूल्य असावे.
डिजिटल शिक्षण: महापालिका शाळांना हायस्पीड इंटरनेट आणि टॅब सुविधा देऊन ‘स्मार्ट’ बनवणे. याबाबत जाणकार शिक्षक हवे.
कौशल्य विकास: केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांना रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण शाळेतच मिळावे.
गरिबाची मुले हीच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. जळगाव टाईम्स न्यूजच्या माध्यमातून आम्ही हे आवाहन करतो की, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ‘मिशन मोड’वर शाळा सुधारणा हाती घ्यावी. गरिबांच्या मुलांच्या डोळ्यातील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणे, हीच खरी समाजसेवा ठरेल!





