जनता शासनाच्या दारी नाही… शासनच जनतेच्या दारी”; महाराजस्व समाधान शिबिरातून शेकडो नागरिकांना योजनांचा लाभ
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा - पालकमंत्री गुलाबराव पाटील


जळगाव (धर्मेंद्र राजपूत) – दि- 7 मार्च : छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभे करताना “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” हा विचार ठेवला होता. त्याच विचाराने शासन आज जनतेच्या दारी पोहोचत आहे. एखाद्या गरीब आईला तिच्या मुलासाठी दाखला मिळणे, एखाद्या शेतकऱ्याचा जमीन प्रश्न सुटणे किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुल मिळणे… या आनंदातूनच शासनाच्या कार्याचे खरे समाधान मिळते. गोरगरिबांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असून, सेवा करण्यासाठीच आपले जीवन आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भोकर व आसोदा येथे त्यांच्या हस्ते आयोजित “महाराजस्व समाधान शिबिरा”च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी एखाद्या साध्या दाखल्यासाठी नागरिकांना तहसील, पंचायत समिती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता शासनाने ठरवले आहे की “जनता शासनाच्या दारी उभी राहणार नाही, शासनच जनतेच्या दारी जाईल.” या संकल्पनेतूनच महाराजस्व समाधान शिबिर सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षांत जिल्ह्यात हजारो लाभार्थ्यांना या शिबिरातून सातबारा, उत्पन्न दाखले, घरकुल तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचाही उल्लेख केला. सरकारने दिलेला शब्द पाळत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पालकमंत्री म्हणून प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी लोकांशी संवेदनशीलतेने वागावे, कारण शासनाच्या टेबलापलीकडे एका कुटुंबाचे आयुष्य उभे असते, अशी जाणीवही त्यांनी करून दिली.

प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी प्रस्ताविकात अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्राजक्ता केदार व उपशिक्षक सुनील पाटील यांनी केले, तर तहसीलदार शीतल राजपूत यांनी आभार मानले.
आसोदा येथे विद्यार्थ्यांची बहिणाबाई चौधरींवर आधारित काव्यनाटिका
जळगाव तालुक्यातील आसोदा येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ कार्यक्रमात स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित काव्यनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या काव्यातील ग्रामीण जीवन, कष्टकरी संस्कृती आणि जीवनमूल्ये प्रभावी अभिनयातून उभी केली. या सादरीकरणाला पालकमंत्र्यांसह मान्यवर व नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
असा देण्यात आला लाभ
या दोन्ही शिबिरांमध्ये कृषी, महसूल, पशुसंवर्धन, भूमी अभिलेख, महिला बचत गट, आरोग्य विभाग आदी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. तसेच रहिवास प्रमाणपत्र, डिजिटल ७/१२, अनु.जमाती जात प्रमाणपत्र, संजय गांधी व श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग लाभार्थी योजना, जिवंत ७/१२ वारस नोंदी, पोटखराब प्रकरणे, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड वाटप, फार्मर आयडी, आयुष्मान कार्ड आदी विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यात असोदा येथे ६१३ तर भोकर येथे ६७७ अशा एकूण १२९० लाभार्थ्यांना विविध सेवा व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
भोकर येथे सरपंच प्रमिलाबाई सोनवणे, मंडळ अधिकारी आशिष वाघ , असोदा मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, बालाशेठ राठी, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, गोपालजी बाहू, डॉ. सत्वशील पाटील, भरत बोरसे, उप तालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, दत्तू आबा सोनवणे, किसन सोनवणे, छोटू सरकार, सुभाष बडगुजर, रमेश आप्पा पाटील, डॉ. दिलीप लाठी उपस्थित होते. तसेच असोदा येथे सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, रवींद्र देशमुख, दूध संघाचे खेमचंद महाजन, सुभाष महाजन, अनिल महाजन, किशोर चौधरी, गिरीश भोळे, अजय महाजन, उमेश बाविस्कर, महेंद्र नारखेडे, संजोग कोळी, बाळकृष्ण पाटील तसेच श्रीराम मंदिराचे ट्रस्टी तसेच भोकर व आसोदा परिसरातील सरपंच, उपसरपंच, लाभार्थी, अधिकारी – कर्मचारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




