जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता करावरील योजना जाहीर
'शास्ती माफी' अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन


जळगाव : दि.4 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नागरिकांकडून वारंवार होणाऱ्या मागणीचा विचार करून जळगाव शहर महानगरपालिकेने मालमत्ता करावरील थकबाकीवर सवलत देण्यासाठी ‘अभय योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी असून, नागरिकांना ०५ मार्च ते १९ मार्च २०२६ या दरम्यान आपल्या मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करून घेता येणार आहे, अशी माहिती महापौर दीपमाला काळे यांनी दिली आहे.
ही योजना लागू झाल्यामुळे नागरिकांना त्यांच्या थकीत करावरील दंडाची रक्कम न भरता केवळ मुळ कर भरून थकबाकीमुक्त होता येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने कर भरणा करण्याकरिता विविध डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात QR कोड स्कॅनिंग, नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI ॲप्स (फोनपे, गुगल पे इ.) याचा समावेश आहे.
शहराच्या विकासासाठी आणि स्वतःवरील थकबाकीचा बोजा कमी करण्यासाठी नागरिकांनी या १५ दिवसांच्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा. महापौर दिपमाला काळे यांनी नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




