राजकीयस्थानिक बातम्या

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

नगरसेविका अंकिता पाटील यांचे महपौरांना निवेदन

जळगाव :(धर्मेंद्र राजपूत)दि.2 शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रभाग क्रमांक ७ मधील शिव कॉलनी आणि परिसरातील नागरिक सध्या दहशतीच्या छायेत आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नगरसेविका अंकिता पंकज पाटील यांनी जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

 

प्रभागातील शिव कॉलनी (गट क्र. ६० व ५४), वर्धमान हायट्स परिसर, आशाबाबा नगर आणि आर.एम.एस. कॉलनी या भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या समूहामुळे नागरिकांच्या झोपेत व्यत्यय येत असून, वाहनचालकांसाठीही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, परिसरात कुत्र्यांनी नागरिकांच्या मागे धावणे आणि चावा घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे परिसरात कमालीची असुरक्षितता निर्माण झाली आहे. नगरसेविका अंकिता पाटील यांनी आरोग्य विभागाला विनंती केली आहे की, संबंधित विभागाने तातडीने पथक पाठवून भटक्या कुत्र्यांना पकडावे. कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करण्यात यावी.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने कराव्यात.या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासन किती लवकर लक्ष देते, याकडे आता प्रभाग ७ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button