स्थानिक बातम्याराजकीय

जळगावच्या वाघूर जलशुद्धीकरण केंद्राची महापौर, उपमहापौरांकडून पाहणी

जळगाव (धर्मेंद्र राजपूत) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर जलशुद्धीकरण केंद्राला शनिवार रोजी महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. उत्तर महाराष्ट्रातील उच्च तंत्रज्ञान असलेले हे केंद्र असून, येथील कामकाजाबाबत महापौरांनी समाधान व्यक्त केले.

 

दैनंदिन १३२ एमएलटी क्षमतेचा प्लांट

या भेटीदरम्यान शहर अभियंता योगेश बोरोले आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख श्यामकांत भांडारकर यांनी जलशुद्धीकरण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. हा प्लांट १३२ एमएलटी क्षमतेचा असून, २००८ पासून कार्यरत आहे. यावेळी शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य व्हॉल्व्ह देखील लोकप्रतिनिधींना दाखवण्यात आला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचे पाणीपुरवठ्याचे नवीन शेड्युल तयार करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

डिजिटल मॉनिटरिंग आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा

महापौर आणि उपमहापौरांनी संगणक कक्षात बसून ऑटोमॅटिक वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम कशी कार्य करते, याचे सादरीकरण पाहिले. केंद्राच्या सुरक्षेसाठी १९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास लक्ष ठेवले जाते. यासोबतच, केंद्रातील प्रयोगशाळेलाही त्यांनी भेट दिली. विशेष म्हणजे, शुद्धीकरण झालेले पाणी महापौरांनी स्वतः पिऊन दर्जाची खात्री केली.

 

सौर ऊर्जेमुळे वार्षिक १२ लाखांची बचत

या केंद्रात १५० किलोवॅट क्षमतेचा सोलर प्लांट बसवण्यात आला आहे. यामुळे महानगरपालिकेचे दरवर्षी सुमारे १२ लाख रुपयांचे वीज बिल वाचत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एका व्यक्तीला दिवसाला साधारण ११५ लिटर पाण्याची गरज भासते, हे गृहीत धरून या प्लांटचे नियोजन केले जाते.

 

भविष्यातील नियोजन आणि निधी

या प्लांटचे भविष्यात ‘क्लास वन’, ‘क्लास टू’ असे विविध वर्गीकरण केले जाणार आहे, ज्यामुळे शासनाकडून विशेष अनुदान (ग्रँड) मिळण्यास मदत होईल. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी प्लांटसाठी लागणारे आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून घेण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. या पाहणी दौऱ्यावेळी अधिकारी दीपक चौधरी, पंकज पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. हे केंद्र तीन शिफ्टमध्ये २४ तास कार्यरत असते.

“जळगाव शहराला शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. वाघूर येथील प्लांटमधील अत्याधुनिक यंत्रणा आणि मनुष्यबळाचे नियोजन पाहून समाधान वाटले.”- दीपमाला काळे, महापौर

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button