खान्देश महोत्सवात रंगला ‘होम मिनिस्टर’चा खेळ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भावूक... खुशखुशीत... हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!


जळगाव :(धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘खानदेश महोत्सव २०२४’ अंतर्गत शनिवारी, २८ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील ८०० पेक्षा अधिक महिलांच्या विक्रमी उपस्थितीने या सोहळ्याची रंगत वाढवली. दैनंदिन धावपळीतून वेळ काढून महिलांनी त्यांचे दुःख विसरून या ठिकाणी खळखळून हसवणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याने होम मिनिस्टर लोकप्रिय कार्यक्रम ठरला.

हास्य-विनोद आणि भावनांचा मेळ
प्रसिद्ध अभिनेते ओम यादव यांनी आपल्या खुमासदार शैलीत या खेळाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमादरम्यान कधी विनोदी चुटकुले, तर कधी महिलांच्या जीवनातील संघर्षाचे गंभीर प्रसंग अशा विविध छटा पाहायला मिळाल्या. या खेळात सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर कधी हसू तर कधी आठवणींचे अश्रू असे भाव दाटून आले होते.
नगरसेवकांसाठी संगीत खुर्ची
केवळ महिला प्रेक्षकांसाठीच नाही, तर उपस्थित नगरसेवकांसाठी देखील ‘संगीत खुर्ची’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभराच्या कामकाजाचा ताण विसरून सर्व लोकप्रतिनिधींनी या खेळाचा मनमुराद आनंद लुटला. होम मिनिस्टर खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५ विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे आणि पैठणी देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला शहराच्या महापौर दीपमाला काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे, वंदना इंगळे (स्थायी समिती), महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या गायत्री राणे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे, डॉ. अमृता सोनवणे यांच्यासह नगरसेविका अंकिता पाटील, अनिता भापसे, माधुरी बारी, कविता शिवदे, रेशमा काळे, शशीबाई ढंढोरे, कविता पाटील, जयश्री पाटील, उज्वला बाविस्कर, आशा पाटील प्रवीण कोल्हे, प्रशासकीय अधिकारी अतिरिक्त आयुक्त शोभाताई बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे आणि अधिकारी गायत्री पाटील उपस्थित होते.प्रचंड गर्दी आणि उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला, ज्यामुळे खानदेश महोत्सवाच्या वैभवात भर पडली.
“कामाच्या व्यापातून महिलांना थोडा विरंगुळा मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. जळगावकर महिलांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद या महोत्सवाचे यश अधोरेखित करतो.”
— दीपमाला काळे, महापौर.




