जळगाव: प्रभाग ४ मध्ये ‘महायुती’च्या नगरसेवकांचा ‘ॲक्शन मोड’; पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी पियुष कोल्हे व सोनवणे परिवार सक्रिय


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत)दि.28 शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरी समस्यांचा निपटारा करण्यासाठी महायुतीचे नगरसेवक सरसावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शनिपेठ आणि परिसरात ‘अमृत’ योजनेच्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेवक पियुष कोल्हे आणि नगरसेविका विद्या मुकुंद सोनवणे व परिवाराने प्रत्यक्ष जागेवर जाऊन दुरुस्ती कामे पूर्ण करून घेत आहे. काही ठिकाणची कामे झालेली आहेत तर काही ठिकाणची कामे दुरुस्तीच्या मार्गावर आहे.

तांत्रिक अडचण दूर करून पाणीपुरवठा सुरळीत
अमृत योजनेच्या कनेक्शनमध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यामुळे अनेक भागांत पाणी अत्यंत कमी दाबाने येत होते, तर काही नागरिकांना पाणीच मिळत नव्हते. ही बाब लक्षात येताच नगरसेवक पियुष कोल्हे यांनी तातडीने महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. कोल्हे यांनी स्वतः उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना दुरुस्तीच्या सूचना दिल्या आणि पाईपलाईनमधील अडथळा दूर करून घेतला. यामुळे आता परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
लोकप्रतिनिधींचा प्रभागात सातत्यपूर्ण दौरा
नगरसेविका विद्या मुकुंद सोनवणे, मुकुंदभाऊ सोनवणे आणि युवराज सोनवणे हे देखील सातत्याने प्रभागात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. गेल्या १०-१५ दिवसांपासून गटरींची साफसफाई आणि स्वच्छतेबाबत असलेल्या तक्रारींवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. युवराज सोनवणे यांनी पाणी प्रश्नाच्या वेळी उपस्थित राहून कामाचा पाठपुरावा केला.
महापालिका प्रशासनाला तत्परतेच्या सूचना
नागरिकांची ओरड होऊ नये आणि त्यांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळाव्यात, यासाठी महायुतीच्या या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला आणि कर्मचाऱ्यांना कामात तत्परता दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधींच्या या सक्रियतेमुळे प्रभाग क्रमांक ४ मधील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लवकरच लागतील अशी अशा आहे.




