जळगावच्या अस्मितेचा जागर की प्रशासनाचा ‘पाहुणचार’? खान्देश महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यगीताचा विसर!


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) दि. 27 खान्देशची संस्कृती, कला आणि खाद्यपरंपरेचा वारसा जगासमोर मांडण्यासाठी जळगाव महानगरपालिकेतर्फे सागर पार्कवर उत्साहात ‘खान्देश महोत्सव’ सुरू झाला. मात्र, उत्साहाच्या भरात महापालिका प्रशासनाला आपल्या राज्याच्या अस्मितेचा म्हणजेच ‘महाराष्ट्र गीताचा’ विसर पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिल्याच दिवशी घडलेल्या या गंभीर चुकीमुळे आणि प्रोटोकॉलच्या बोजवाऱ्यामुळे जळगावकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाचा ‘सांस्कृतिक’ की ‘शासकीय’ पेच?
कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ झाले, मात्र राज्यगीत झाले नाही. यावर महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त करत प्रशासनाला सुधारणेच्या सूचना दिल्या. मात्र, दुसरीकडे महापालिका आयुक्तांनी “हा शासकीय नसून सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने राज्यगीताची बाब नव्हती,” अशी सारवासारवी केल्याने चर्चेला उधाण आले आहे. प्रश्न असा उरतो की, महाराष्ट्राच्या मातीत होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गर्जणार नसेल, तर तो महोत्सव कसला?
नगरसेवकांचा अवमान आणि नावांचा गोंधळ
केवळ राज्यगीतच नाही, तर प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या बाबतीतही कमालीचा निष्काळजीपणा दाखवला. ज्येष्ठतेनुसार नगरसेवकांच्या नावांचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही, तर महिला नगरसेवकांच्या नावांतही चुका झाल्या. ज्या लोकप्रतिनिधींच्या बळावर महापालिका चालते, त्यांचाच योग्य सन्मान राखला न गेल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महोत्सव का आणि कोणासाठी?
हा महोत्सव केवळ गाणी आणि जेवणावळ्यांसाठी नाही. खान्देशी मातीचा गंध, येथील अहिराणी बोली आणि कष्टकऱ्यांची कला घराघरांत पोहोचावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे केवळ एक ‘ड्युटी’ म्हणून न पाहता, ‘जळगावची शान’ म्हणून पाहायला हवे. कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि नियोजनातील अचूकता यातूनच खान्देशची प्रतिमा उंचावू शकते.
काय हवंय प्रशासनाकडून?
१. अस्मितेचा आदर: इथून पुढच्या प्रत्येक दिवशी राज्यगीताचा सन्मान राखला जावा.
२. प्रोटोकॉलचे पालन: लोकप्रतिनिधी आणि निमंत्रितांचा त्यांच्या पदानुसार सन्मान राखणे ही प्रशासकीय जबाबदारी आहे.
३. चुकांचे विश्लेषण: पहिल्या दिवशी नेमका विसर का पडला? तांत्रिक अडचण होती की नियोजनाचा अभाव? याचे उत्तर प्रशासनाने देणे अपेक्षित आहे.
खान्देश महोत्सव हा जळगावच्या वैभवाचा कळस ठरायला हवा, प्रशासकीय अनास्थेचे प्रदर्शन नाही. महापौरांच्या हस्तक्षेपानंतर आता तरी प्रशासन जागे होऊन पुढचे दिवस ‘महोत्सव’ खऱ्या अर्थाने गाजवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




