राजकीयस्थानिक बातम्या

जळगाव महापालिकेत पारदर्शकतेसाठी पुन्हा सुरू होणार ‘नगरसेवक डायरी’? सौ. वैशाली पाटील यांची महापौरांकडे आग्रही मागणी

जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) दि.26 जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण वॉर्ड स्तरावरच प्रभावीपणे करण्यासाठी प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीत यशस्वी ठरलेली ‘नगरसेवक डायरी’ योजना तात्काळ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली असून या संदर्भात त्या उद्या मा. महापौर, मा. आयुक्त आणि मा. उपमहापौर यांना सविस्तर निवेदन सादर करणार आहेत.

काय आहे ‘नगरसेवक डायरी’ योजना?

या योजनेअंतर्गत प्रत्येक वॉर्डासाठी एक अधिकृत नोंदवही (डायरी) ठेवली जाते. यामध्ये संबंधित वॉर्डात होणाऱ्या रोजच्या कामांचा जसे की:

फवारणी आणि कीटकनाशक नियंत्रण

गटार साफसफाई आणि सांडपाणी व्यवस्थापन

रस्ते स्वच्छता आणि कचरा उचलणे

या सर्व कामांची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांकडून केली जाते. विशेष म्हणजे, काम पूर्ण झाल्यावर त्या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात आणि त्यानंतर संबंधित नगरसेवकाची स्वाक्षरी घेतली जाते.

प्रशासनात येणार उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता

नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांनी नमूद केले की, सध्या अशा प्रकारची कोणतीही अधिकृत नोंद पद्धत नसल्यामुळे अनेकदा कामे झाली की नाही, याबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम निर्माण होतो. “नगरसेवक डायरीमुळे प्रत्यक्षात झालेल्या कामाचा लेखाजोखा समोर येईल. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव वाढेल आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवर तात्काळ आळा बसेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांचा वाढणार प्रशासनावरील विश्वास

वॉर्डातील विकासकामांची पारदर्शक माहिती थेट नागरिकांना मिळणार असल्यामुळे प्रशासनावरील त्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. प्रभाग १३ च्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सौ. पाटील यांच्या या मागणीमुळे शहरात स्वच्छतेचा आणि नियोजनाचा नवा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता या निवेदनानंतर महापालिका प्रशासन या जनहिताच्या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागले आहे. ही योजना पुन्हा सुरू झाल्यास जळगाव महापालिका पारदर्शक कारभाराच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकेल, अशी भावना शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button