५ वा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी रंगणार..


जळगांव (धर्मेंद्र राजपूत) दि.26 अजिंठा फिल्म सोसायटी आणि कान्ह ललित कला केद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी जळगावात कान्ह ललित कला केंद्र, एम.जे.काँलेज परिसर येथे संपन्न होत आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उत्साह शिगेला पोहोचला आहे.चित्रपट विषयक प्रदर्शनी , शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे.
जेष्ठ अभिनेते मनोज जोशी हे देवगिरी चित्रतपस्वी पुरस्कार तर अभिनेता आरोह वेलणकर,अभिनेत्री सुरभी हांडे यंदाच्या ‘देवगिरी चित्रगौरव’ पुरस्काराचे मानकरी
यंदा या महोत्सवाचे ५ वे वर्ष असून देशभरातील २० राज्यांमधुन तसेच विदेशातून या महोत्सवासाठी शॉर्टफिल्म ,डाँक्युमेन्ट्रि,कँम्पस फिल्म, बाल फिल्म सहभागी झाल्या
आहेत. तज्ञ परिक्षकांमार्फत परिक्षण करुन यातील निवडक ८० शॉर्ट फिल्मचे अधिकृत प्रदर्शन या दोन दिवसीय महोत्सवात करण्यात येणार आहे.देशभरातील सुमारे ३०० युवा फिल्म मेकर्स यानिमित्ताने जळगावात येत आहेत.त्यामुळे जळगावकर नागरिकांना विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण लघुपट, माहितीपटांची मेजवानी मिळणार आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अनेक गणमान्य कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण परिसराला दादासाहेब फाळके चित्र नगरी असे नाव देण्यात आले आहे तर स्क्रिनींग सभागृहांना अभिनेते धर्मेंद्र देओल ,अभिनेत्री संध्या शांताराम व अभिनेत्री प्रिया मराठे यांची नावे देण्यात आली आहेत.दि.२८ रोजी या सर्व कक्षांच्या उद्घाटन व फिल्म स्क्रिनींग ने स ९:०० वा. महोत्सवाचा शुभारंभ होईल. महोत्सवात निवडक ८० चित्रपटांचे प्रदर्शन दोन दिवसांत तिनही कक्षात करण्यात येणार आहे.
दुपार सत्रात ११:३० ते १२:३० या वेळात ‘चित्रपट आणि समाज जागरण ‘ या विषयावर जेष्ठ चित्रपट अभ्यासक तथा संस्कार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री.अभिजित गोखले यांचा मास्टर क्लास होणार आहे. तर दुपारी ०३ ते ०४ या सत्रात विवाह,गोलमाल, हेराफेरी फेम अभिनेते मनोज जोशी यांचा ‘रंगभूमी ते चित्रपट सृष्टी एक प्रवास’ या विषयावर मास्टर क्लास होईल.
वंदे मातरम् मुख्य सभागृहात सायंकाळी ५:०० वा.महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार,अभिनेते श्री.मनोज जोशी,श्री. अभिजित गोखले,उद्योजक श्री.अशोकभाऊ जैन,उद्योजक प्रकाशसेठ चौबे,आमदार राजुमामा भोळे,डॉ.शिल्पा बेंडाळे इ.मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होईल. शो मँन स्व.राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येईल. यावेळी अभिनेते मनोज जोशी यांना अत्यंत मानाचा यावर्षीचा देवगिरी चित्रतपस्वी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वा.टुरींग टाकीज या सत्रात श्री.दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट बास्केट बाँल मैदान येथे प्रदर्शित करण्यात येईल. यावेळी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आपल्या पालकांसह चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावणार आहेत तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यावेळी रसिकांशी खुला संवाद साधणार आहे.
दि.०१ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून तिनही सभागृहात फिल्म स्क्रिनींग होईल. स.११ वा. दिग्दर्शकाच्या नजरेतून छत्रपती शिवराय या शिर्षकाची दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर पुणे यांची प्रकट मुलाखत होईल. दु.०१:०० वा.सुप्रसिद्ध अभिनेते श्री. योगेश सोमण आणि दिग्दर्शक अतुल गंगवार मार्गदर्शन करतील यात चित्रपट निर्मिती प्रक्रिया – आव्हाने आणि संधी या विषयावर युवा फिल्म मेकर्स साठी मास्टर क्लास होईल. दुपारी ०३:०० वा. होणाऱ्या ओपन फोरम सत्रात योफिमा शिष्यवृत्ती २०२५ -२६ चे विजेते युवा चित्रकर्मी सह सुप्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर आणि अभिनेत्री सुरभी हांडे युवकांशी चर्चा करणार आहेत. संध्याकाळी ५ वा.महोत्सवाचे समापन सत्र होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील,जेष्ठ विचरवंत श्री.प्रमोद बापट,अभिनेते श्री.योगेश सोमण,श्री. अतुल गंगवार,सामाजिक कार्यकर्ते श्री. भालचंद्र पाटील,उद्योजक श्री.अशोकभाऊ जैन, श्री प्रकाशसेठ चौबे,इ.मान्यवर उपस्थित राहणार आहे.या प्रसंगी भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. अत्यंत मानाचा मानला जाणारा यंदाचा देवगिरी चित्र गौरव पुरस्कार आरोह वेलणकर आणि सुरभी हांडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.सर्वोत्कृष्ट शाँर्टफिल्म, कँम्पस फिल्म ,माहितीपट यांना सामुहिक तसेच वैयक्तिक पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र शासन,फिल्म सिटी, जैन उद्योग समुह, श्री.रामलाल चौबे ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हा संपूर्ण महोत्सव सर्व नागरिक, रसिक श्रोते तथा चित्रपट क्षेत्रात करियर करु इच्छित तरुणांसाठी पुर्णपणे मोफत असणार आहे.
या दोन दिवसीय महोत्सवाचा जळगावकर नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर,प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे,कान्ह कला केंद्राचे शशिकांत वडोदकर,फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल भोळे,सचिव विनीत जोशी,कोषाध्यक्ष डॉ.संजय हांडे, सहसचिव डॉ.सुचित्रा लोंढे,आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.जयेंद्र लेकुरवाळे,उपाध्यक्ष,पंकज सोनवणे,अँड.प्रसाद गोडबोले तथा चित्रसाधना प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी केले आहे.




